शिवनगर: इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी शिक्षण मंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रश्नपत्रिकांची गोपनीयता अबाधित राखण्यासाठी तसेच पेपरफुटीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ’जीपीएस सक्षम डिजिटल लॉक असलेली ट्रंक’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात प्रथमच हा प्रयोग बारामती तालुक्यात राबविण्यात येत असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी यांनी दिली.
शिक्षण मंडळाच्या या निर्णयामुळे प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीदरम्यान होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये परीक्षेच्या विश्वासार्हतेबाबत अधिक खात्री निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये
रिअल-टाइम ट्रॅकिंग : प्रश्नपत्रिका वाहून नेणारे वाहन कुठे आहे, याची माहिती नियंत्रण कक्षाला सतत मिळणार. डिजिटल की प्रणाली : ट्रंक उघडण्यासाठी विशेष डिजिटल कोड किंवा ओटीपीचा वापर; तो केवळ ठराविक वेळेतच सक्रिय होणार. मार्ग बदलल्यास अलर्ट : वाहनाने निश्चित मार्ग बदलल्यास किंवा ट्रंकशी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास तत्काळ मुख्य कार्यालयाला सूचना मिळणार.
...अशी असेल नवी सुरक्षा व्यवस्था
कस्टोडियन (मुख्य साठवणूक केंद्र) येथून परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पाठवताना त्या विशेष ट्रंकमध्ये ठेवण्यात येतील. या ट्रंकला अत्याधुनिक डिजिटल लॉक बसविण्यात आले असून, ते जीपीएस तंत्रज्ञानाशी संलग्न असेल. संबंधित ट्रंक निश्चित परीक्षा केंद्रावर आणि ठराविक वेळेतच उघडता येईल. त्यापूर्वी ती उघडणे शक्य होणार नाही.
अलीकडील काळात पेपरफुटीच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा आणि स्वागतार्ह आहे. या प्रणालीमुळे परीक्षा निकोप व पारदर्शक पद्धतीने पार पडतील.नीलेश गवळी, गटशिक्षणाधिकारी, बारामती