Baramati Bank Manager Ends Life
बारामती: बॅंक ऑफ बडोदाच्या बारामती शाखेचे व्यवस्थापक शिवशंकर मित्रा (वय ५२, मूळ रा. रा. प्रयागराज, उत्तरप्रदेश, सध्या रा. बारामती ) यांनी मध्यरात्री बॅंकेतच गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली असून त्यामध्ये अतिरिक्त दबावामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
या प्रकारामुळे बारामतीत मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मित्रा यांन पाच दिवसांपूर्वीच बॅंकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडे स्वेच्छानिवृत्ती मागितली होती. परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वाढत्या तणावातून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. (Latest Pune News)
चिठ्ठीमध्ये त्यांनी मी शिवशंकर मित्रा, मुख्य प्रबंधक बॅंक ऑफ बडोदा, बारामती. मी आज बॅंकेच्या अतिरिक्त दबावामुळे आत्महत्या करत आहेत. माझी बॅंकेकडे विनंती आहे की, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त दबाव टाकू नका, सर्वांना आपापल्या जबाबदारीची पूर्णपणे जाणीव आहे आणि ते शंभर टक्के आपले योगदान देत असतात.
मी माझी आत्महत्या पूर्णपणे शुद्धीत असताना व स्वच्छेने करत आहे. त्यामध्ये माझ्या कुटुंबाची कोणतीही चूक नाही. कोणालाही जबाबदार धरू नये, फक्त बॅंकेच्या प्रचंड दबावामुळे मी जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे.
पत्नी व मुलगी यांना उद्देशून त्यांनी, प्रिया मला माफ कर, माही मला माफ कर असे लिहिले आहे. शक्य झाल्यास माझे नेत्रदान करावे अशी इच्छा चिठ्ठीत व्यक्त केली आहे. या चिठ्ठीतील मजकूर नेमका त्यांनीच लिहिला आहे का, वरिष्ठांकडून त्यांना काही त्रास होता का, यासंबधी आता पोलिसांकडून तपास सुरु आहे.