Dr Sharadchandra Pawar College of Agriculture Pudhari
पुणे

Baramati Agriculture College UK Patent: बारामतीच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या चार कल्पनांना यूके पेटंट

कृषी संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाला बळ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता

पुढारी वृत्तसेवा

बारामती: कृषीक्षेत्रातील संशोधन, नवकल्पना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्याच्या दिशेने ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयाने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या चार नावीन्यपूर्ण कल्पनांना यूके पेटंटची मान्यता मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला मिळालेली ही आंतरराष्ट्रीय पावती बारामतीच्या कृषी शिक्षणक्षेत्रासाठी उल्लेखनीय ठरली आहे.

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त तथा सचिव सुनंदा पवार यांच्या मार्गदर्शनातून कृषी शिक्षणाला संशोधन, नवकल्पना आणि प्रत्यक्ष शेतीतील समस्यांच्या निराकरणाशी जोडण्यावर सातत्याने भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष शेतीतील समस्या ओळखणे, त्यावर शास्त्रीय पद्धतीने उपाय विकसित करणे आणि त्या कल्पनांचे बौद्धिक संपदेत रूपांतर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

महाविद्यालयात निर्माण झालेल्या संशोधनाभिमुख वातावरणाचा परिणाम म्हणून पदवीच्या शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना प्रयोग, संशोधन, नावीन्यपूर्ण कल्पना आणि पेटंट प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रत्यक्ष उपयोगी स्वरूप देण्यासाठी महाविद्यालयाचा संशोधन विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.

या यशामध्ये संस्थेचे संशोधन सल्लागार प्रा. अभिषेक ढवाण आणि त्यांच्या संशोधन समूहाचे मार्गदर्शन, तांत्रिक सहकार्य व अथक परिश्रम महत्त्वाचे ठरले. महाविद्यालयात स्मार्ट शेती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि शेतकऱ्यांच्या वास्तविक समस्यांशी विद्यार्थ्यांना जोडण्यावर भर दिला जात आहे.

त्यामुळे विद्यार्थी भविष्यात कृषी संशोधक, कृषी उद्योजक आणि आधुनिक शेतीचे नेतृत्व करणारे व्यावसायिक म्हणून घडावेत, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या यशासाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे समन्वयक प्रा. ए. बी. रासकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल गोंडे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्राचार्या आरती भोईटे, उपप्राचार्य एस. पी. गायकवाड, स्कूल ऑफ फार्मसीचे विभागप्रमुख प्रा. सागर शिंदे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधन समूह, तांत्रिक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT