Baramati Ajit Pawar House Aghori Rituals Case
बारामती: एकीकडे बारामती नगरपरिषदेची धामधूम सुरु असताना बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी या निवासस्थानासमोर अघोरी पूजा, भानामतीचा प्रकार केल्याचे उघडकीस आले. यामुळे बारामतीत खळबळ उडाली असून अंधश्रद्धा निर्मुलन समितीने अशा खुळचट प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
सहयोग सोसायटी उच्चभ्रू समजली जाते. तेथे २४ तास सुरक्षारक्षक, पोलिसांचाही बंदोबस्त असतो. या परिसरात सीसीटीव्ही सुरक्षेसाठी लावण्यात आलेले आहेत. तरीही सोसायटी बाहेरील पदपथावर ही अघोरी पूजा कोणी आणि कधी केली असेल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. निवडणूकीत तिकिट मिळावे या भावनेतून हा प्रकार केला गेला असावा, अशी एक शक्यता पुढे येत आहे.
सोसायटीच्या मुख्य गेटजवळ जमिनीवर लिंबू, मिरची, काळे कापड, डाळी, काळ्या रंगाची काढलेली चांदणी, हळद-कुंकू, नारळ, गारगोटीचे दगड वापरून पूजा केली आहे. तसेच लिंबाचा उतारा सुद्धा येथे आढळून आला. हा प्रकार सकाळी सहयोग सोसायटीतील रहिवाशांना दिसला. त्यानंतर लगेचच परिसरात एकच खळबळ उडाली. निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की, हे कुणाच्या विरोधात कट रचण्यासाठी किंवा निवडणुकीत कुणाचे तिकीट कापण्यासाठी, केले असावे. तर काहींना वाटते की, कुणाचे तिकीट पक्के करण्यासाठी असा प्रकार केला गेला असावा. पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. बारामतीत अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान हा प्रकार सुरुवातीला अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष विपुल पाटील यांनी उघडकीस आणला. त्यांनी सोशल मिडियावर यासंबंधी पोस्टही केली. पाटील हे सोमवारी (दि. १७) छत्रपती कारखान्याचे संचालक अजित पाटील, अभिनेते रामभाऊ जगताप यांच्यासह सोमवारी सकाळी सहयोग सोसायटीसमोर माॅर्निंग वाॅक साठी निघाले असताना त्यांना हा प्रकार आढळून आला. येथील अघोरी पूजा व उतारा पाहून येणारे जाणारे जरा लांबूनच जातत होते. स्वच्छता करणारी महिला मनातील अंधश्रद्धेमुळे स्वच्छता करण्यास धजावत नव्हती. अखेर पाटील यांनी उतारा ठेवलेल्या ठिकाणी थांबत ती जागा साफ करायला लावली.
ज्या बारामतीत सिंगापूरच्या धर्तीवर सुधारणा केल्या जात आहेत तेथे अशा खुळचट विचाराने रस्त्यावर कर्मकांड होत असतील तर नेमके आपण चाललोय कुठे ? असा सवाल पाटील यांनी केला. निवडणूका जवळ आल्या की अशा गोष्टी घडतात, कदाचित त्यातून हा प्रकार घडला असावा अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.