पुणे

Exam Stress: बारामतीत पुन्हा अल्पवयीन विद्यार्थिनीने जीवन संपवले; परीक्षेच्या तणावातून टोकाचे पाऊल?

टेरेसवरून उडी मारत संपवले जीवन, अभ्यास व परिक्षेच्या ताणातून पाऊल उचलल्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती शहरातील भिगवण रस्ता परिसरातील एका निवासी इमारतीत राहणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने शुक्रवारी (दि. ४) पहाटे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलीला तात्काळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले गेले. उपचारादरम्यान पहाटे पाचच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

ही विद्यार्थिनी अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. सध्या तिच्या परीक्षा सुरु होत्या. तिच्या पालकांनी शहर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून ती परीक्षेचा ताण घेत होती. अभ्यास होत नसल्याचे तसेच परीक्षेचा तणाव येत असल्याचे तिने आई-वडीलांकडे बोलून दाखवले होते.

शुक्रवारी रात्री १२.३० वाजेपर्यंत ती अभ्यास करत होती. त्यानंतर टेरेसवर जावून येते असे सांगून ती घराबाहेर पडली. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीवर गेली. बराच वेळ होवूनही ती खाली न आल्याने तिचे वडील तिला पाहण्यासाठी टेरेसवर गेले असता ती टेरेसच्या कड्यावर पाय सोडून बसलेली दिसली.

वडीलांनी तिला आवाज देताच तिने त्यांच्याकडे पाहत अचानक टेरेसवरून खाली उडी मारली. इमारतीच्या समोरील भागात ती पडल्याने तिला गंभीर दुखापत झाली.

तिच्या आई-वडील व शेजाऱ्यांनी तात्काळ तिला उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना काही काळ ती शुद्धीवर होती. तिने आईकडे पिण्यासाठी पाणी मागितले. परंतु त्यानंतर तिची प्रकृती गंभीर झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

ही विद्यार्थिनी या पूर्वीही घरातून निघून गेली होती. त्यावेळी ती हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल होती. तिच्याकडे स्वतःचा फोन नव्हता. घटनास्थळाची पाहणी, आवश्यक पंचनामे, उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय कागदपत्रे, डिजिटल बाबी तसेच पालक, नातेवाईक, मैत्रिणी, शिक्षक व आवश्यक संबंधित व्यक्तींचे जबाब घेऊन घटनेमागील नेमकी वस्तुस्थिती निष्पन्न करण्याच्या दृष्टीने बारामती शहर पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

अभ्यासाचा ताण हे प्राथमिक कारण पालकांकडून सांगितले जात आहे. परंतु त्या व्यतिरिक्त वैयक्तिक कारणे, शैक्षणिक व कौटुंबिक काही कारणे किंवा कोणाकडून काही त्रास, दबाव, आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखी काही बाब घडली होती का, याचाही तपास केला जात असल्याचे पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

गत महिन्यात बारामतीत एका १५ वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली होती. या मुलीच्या मृत्युप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी सखोल चौकशीची मागणी केली होती. पोलिसांनी चौकशीअंती तिचा मृत्यू टेरेसवरून उडी मारल्यानेच झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येची दुसरी घटना शहरात घडली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT