Baramati Weather Update: बारामती तालुक्यातील शेतकर्यांना पावसाबरोबरच ऑक्टोबर हिटचाही सामना करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून बारामती शहर आणि तालुक्यात नागरिकांना कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
परतीच्या पावसाने पिकांचे ठिकठिकाणी नुकसान होत आहे. शेतातील पिके काढणी व मळणीची कामे करताना उन्हाचा त्रास शेतकर्यांना सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यात मान्सून राज्यातून परतल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली.
परंतु, स्थानिक हवामानातील बदलामुळे पाऊस (Rain) सुरू आहे. तालुक्यात विविध भागांत जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. भाजीपाला, मका, फुले, कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले आहे. बिगरहंगामी पिकांचेही नुकसान झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतात पाणी साठले आहे. कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले आहे. रस्त्यावर आणि शेतात पाणी साठले आहे. कांदा, सोयाबीन व बाजरीचे मोठे नुकसान झाले आहे. कापसाच्या पिकालाही पावसाचा फटका बसला आहे.
दिवाळी (Diwali) तोंडावर असतानाच सकाळपासूनच उष्णतेने अंगाची लाहीलाही होत आहे. प्रचंड उकाड्याने नागरिक बेजार झाले आहेत. पावसाने विश्रांती घेतल्याने उष्णतेत वाढ झाली आहे.
गेल्या चार दिवसांपासून बारामती शहर आणि तालुक्यातील जनतेला ऑक्टोबरच्या हिटचा सामना करावा लागत आहे. उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी बळीराजा सकाळच्या सत्रातच शेतातील कामे उरकून घेत आहे. दरम्यान, यंदा बारामती (Baramati) तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला आहे.