महेंद्र कांबळे
पुणे: एकीकडे एमपीडीएसारखी स्थानबद्धतेची कारवाई शहरातील गुन्हेगारीला लगाम घालत असतानाच दुसरीकडे तडीपारीची कारवाई ही पोलिसांसाठी काम वाढवताना दिसत आहे. शहरातून तडीपार करण्यात आलेले अनेक सराईत गुंड परवानगी न घेता पुन्हा पुण्यात दाखल होत आहेत.
मागील काही महिन्यांत 20 हून अधिक गुंडांनी शहरात बेकायदेशीर कमबॅक केल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांची तडीपारीची कारवाई केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. (Latest Pune News)
गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस हे गुंडांवर कारवाई करत असताना त्यांना कायद्याची भीती राहिली का नाही, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. जे गुन्हेगार वारंवार गंभीर गुन्हे करतात, सामाजिक शांततेला धोका निर्माण करतात किंवा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करतात, अशा व्यक्तींना ठरावीक कालावधीसाठी जिल्ह्याच्या हद्दीबाहेर पाठवते जाते. त्याला प्रामुख्याने तडीपारीची कारवाई असे म्हटले जाते.
पुणे पोलिस आयुक्तालयातून गुंडांना तडीपार करण्यात येते. परंतु, तडीपार झालेल्यांपैकी काही गुन्हेगार तडीपारीचा आदेश डावलताना आढळतात. काही गुन्हेगारांनी तडीपारीतही शहरात येऊन गुन्हे केल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे तडीपारीची कारवाईची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांकडून हे तडीपार केलेले गुंड शहरात तडीपारीचा कालावधी संपल्याशिवाय शहरात येणार नाहीत, याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे.
यंत्रणेला लक्ष द्यावे लागणार
तडीपार गुन्हेगारांना शहरात न येण्यास कायद्याने बंदी असली तरी प्रत्यक्षात पोलिस यंत्रणा त्यांच्यावर ठोस नियंत्रण ठेवण्यात कमी पडत असलेल्याचे मागील काही कारवायांमुळे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सव जवळ आला असताना अशा गुंडांकडून शहराची शांतता भंग होणार नाही, याकडेही यंत्रणेला लक्ष द्यावे लागणार आहे.
कमबॅक रोखण्यासाठी काय करणे आवश्यक?
तडीपार गुंडांच्या हालचालींवर फोन लोकेशनद्वारे लक्ष ठेवणे.
शहराच्या प्रवेशद्वारांवर अधिक काटेकोर तपासणी करणे गरजेचे आहे.
नागरिकांनी त्वरित तक्रार केल्यास पोलिसांनी कारवाई करणे.
राजकीय हस्तक्षेप टाळणे.