Baneswar Bee Accident Pudhari
पुणे

Baneswar Bee Accident: मधमाशांचे पोळे काढताना तरुणाचा मृत्यू; वनविभाग आणि ट्रस्टने हात केले वर

बनेश्वर येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

नसरापूर : संबंधितांनी सुरक्षा उपकरणांच्या अभावाकडे दुर्लक्ष केल्याने मधमाशांचे पोळे काढताना झाडावरून पडून झालेल्या अपघातात एका तरुणाला जिवाला मुकावे लागले. याबाबत संबंधितांनी हात वर केल्याचा आरोप आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. याबाबत बनेश्वर देवस्थान ट्रस्टने हे काम केल्याचे वनविभागाने सांगितले. मात्र, ट्रस्टने आरोप फेटाळले आहे. यामुळे नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न आदिवासी समाजाला पडला आहे.

नसरापूर (ता. भोर) येथील बनेश्वर मंदिराबाहेरील वनविभागाच्या हद्दीतील असणाऱ्या झाडावरील मधमाशांचे पोळे काढताना विष्णू मारुती पवार हा पडून मृत्युमुखी पडला. ही घटना बुधवारी (दि. 18) रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली आहे. पोळे काढण्यासाठी हजर असलेले इतरांनी झाडावरून पडलेल्या विष्णू पवार याला नसरापूर येथील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून ससून येथे उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळी सत्यशोधक बहुजन आघाडीचे राज्याचे सचिव गणपत काटेकर यांनी पाहणी करून मृत्युमुखी पडलेल्या मयत विष्णू पवार याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणार असल्याची भूमिका घेतली.

वास्तविक वनविभागाचे मालकीचे झाडावरील पोळे हे वनविभागाने काढणे अपेक्षित होते. बनेश्वर मंदिर परिसरातील झाडावर असलेल्या मधमाश्यांचे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांवर हल्ले वाढू लागले होते. या पार्श्वभूमीवर बनेश्वर ट्रस्टने याबाबत वनविभागाकडे पोळे काढण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र, संबधितांनी पोळे काढण्यासाठी अनुभवी कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण देत ट्रस्टवरच जबाबदारी ढकलली. मात्र, संबधितांनी असुरक्षित पोळे काढताना अग्निशमन दल किंवा तज्ज्ञांची मदत न घेता घाईघाईने पोळे काढण्याचा आदिवासी समाजातील काही लोकांना पाचारण केल्याचे आरोप काटेकर यांनी केला आहे.

आमच्याकडे प्रशिक्षित अनुभवी कर्मचारी उपलब्ध नसल्याने मधुमक्षिका पालनतज्ज्ञाकडून मधमाश्यांचे पोळे काढून घेण्याबाबत लेखी बनेश्वर देवस्थान ट्रस्टला कळविले होते. या घटनेला वनविभाग जबाबदार नाही.
वसंत चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी नसरापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT