Baneshwar Temple Pudhari
पुणे

Baneshwar Temple: शनिवार पेठेत 1857 च्या काळात वसलेले ऐतिहासिक बाणेश्वर मंदिर

दर्शनासाठी भाविकांची असते नेहमीच गर्दी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील अनेक जुन्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे शनिवार पेठेतील श्री बाणेश्वर मंदिर. हे मंदिर मध्यवर्ती भागात असून याठिकाणी भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. श्रावणी सोमवारलाही येथे वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या ऐतिहासिक मंदिराबद्दल जाणून घेऊयात. (Pune News Update)

शनिवार पेठेत अनेक जुनी शिवमंदिरे आहेत. त्यातील एक श्री बाणेश्वर मंदिर. शनिवार पेठेतील लेले वाड्यात 118 येथे वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग आहेत. 1857 च्या तथाकथित बंडाचे दिवस होते. या वेळेस साधू, संन्यासी, बैरागी यांना इंग्रजांचा त्रास सहन करावा लागे. कारण, क्रांतिकारक अशा वेशात वावरतात, असा इंग्रजांचा समज होता. त्यामुळे अशा लोकांना पकडणे, डांबून ठेवणे, अशा गोष्टी चौकशीच्या निमित्ताने घडत असत. त्या काळातील इंग्रज अधिकार्‍यांनीही अशी नोंद केलेली आढळते. एका मध्यरात्री पुण्यात फरासखाना पोलिस ठाण्यात अशाच एका सत्पुरुषास डांबून ठेवण्यात आले होते.

त्या वेळी लेले नावाचे गृहस्थ जे लेले वाड्याच्या पूर्वजांपैकी एक होते, ते तेथे जेलर होते. त्यांनी असे बघितले की, आतमध्ये डांबून ठेवलेले गृहस्थच बाहेर नळावरही आंघोळ करत आहेत. त्यांनी आत जाऊन पाहिले तर ते गृहस्थ दोन्हीकडे होते. त्यांना आश्चर्य वाटले. हा कोणीतरी आहे, असे त्यांना समजले. त्यांनी ही गोष्ट इंग्रज अधिकार्‍यांना सांगितली. तेव्हा त े अधिकारी लेले आणि भारतीय लोकांना चुकीचे बोलले. पण, आपण एका सत्पुरुषाला बंदी केले आहे, याची खात्री वाटून लेले यांनी त्यांची क्षमा मागून त्यांना सोडून दिले. सत्पुरुषही तेथून निमूटपणे निघाले. त्यावेळी लेले यांनी त्यांना विनवणी करून क्षमा मागितली आणि प्रसाद म्हणून चिमूटभर विभूती दिली तरी चालेल, असे सांगितले. तेव्हा ते सत्पुरुष म्हणाले, मी आता तुला काही देत नाही, पण खात्रीने तुला प्रसाद देण्यासाठी परत येईन, ही झालेली घटना लेले विसरून गेले.

पण, काही दिवसांनी एका रात्री बारा वाजता वाड्याच्या मोठ्या दरवाज्यावर थाप पडली. दरवाजा उघडल्यावर त्यांनी पाहिले की, तो सत्पुरुष दारात उभा होता आणि त्याच्या डोक्यावर भलीमोठी परात होती. ते म्हणाले, तुला प्रसाद हवा होता, तो मी आणला आहे, त्या परातीत शेकडो शिवलिंग आहेत. सर्व शिवलिंग अप्रतिम आहेत, लेले यांनी ओसरीवर देवघरासाठी जागा करून त्या शिवलिंगांची पूजा आरंभिली. त्यात मोठे शिवलिंगमध्ये असून, तेथेच श्री व्याघ—ांबरी बुवा महाराजांचे एक छायाचित्र ठेवले आहे, अभिषेकासाठी अभिषेक पात्र बसविले आहे. अद्यापही या शिवलिंगांची पूजा केली जाते. श्रावणी सोमवारला भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. हे मंदिर फक्त सोमवारी दर्शनासाठी खुले असते, अशी माहिती मंदिराचे वामन लेले यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT