Baner Pashan Sus Highway Pudhari
पुणे

Baner Pashan Sus Skywalk Demand: बाणेर–पाषाण–सूस उड्डाणपुलावर पादचाऱ्यांचा जीवघेणा प्रवास; स्कायवॉकची मागणी तीव्र

जिने आणि स्कायवॉक नसल्याने नागरिकांना महामार्ग ओलांडताना प्रचंड धोका; प्रशासनावर तीव्र नाराजी

पुढारी वृत्तसेवा

बाणेर: पाषाण आणि सूस या भागांना जोडणाऱ्या राजमाता जिजाऊ उड्डाणपुलामुळे वाहनांची वाहतूक तर सुरळीत झाली. मात्र, पादचारी नागरिकांच्या नशिबी असलेली पायपीट आणि जीवघेणा प्रवास अद्याप संपलेला नाही. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना ये-जा करण्यासाठी पुलावर जिने नाहीत.

तसेच, या ठिकाणी महामार्ग पार करणाऱ्या पादचाऱ्यांसाठी स्काय वॉकही करण्यात आला नसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागत आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे अपघाताची वाट पाहताय का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.

महामार्गाच्या पलीकडे आपल्या दैनंदिन कामासाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या ठिकाणी महामार्गाच्या अलीकडे व पलीकडे दोन्हींकडे मोठमोठ्या कंपन्या झाल्या आहेत. अनेक कर्मचारी वर्ग आपला जीव मुठीत धरून दररोज महामार्ग पार करतो. त्यामुळे एक तर पुलाला जिने करण्यात यावेत किंवा महामार्गावर पादचाऱ्यांसाठी स्काय वॉक करण्यात यावा, अशी मागणी या ठिकाणी जोर धरू लागली आहे.

पुलावर पादचाऱ्यांसाठी चढण्या-उतरण्याची सोय (जिने) नसल्यामुळे नागरिकांना दोनच पर्याय उरतात :

1. वेगवान वाहनांच्या गर्दीतून जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडणे.

2. उड्डाणपुलावरून तब्बल एक ते सव्वा किलोमीटरचा वळसा घालून पायपीट करणे.

यात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

पुलाच्या दोन्ही बाजूंना जिने उभारण्याची मागणी स्थानिक रहिवासी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने करत आहेत. मात्र, पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि महामार्ग विभाग प्रशासन या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे
समीर उत्तरकर, स्थानिक रहिवासी
सूस खिंड महामार्गालगत आणि कंपन्या, वाहनांचे शोरूम आहेत. यामुळे या ठिकाणी कामाला येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. बसणे व इतर वाहनांनी येणाऱ्यांना दररोज धोकादायक पद्धतीने येथे महामार्ग पार करावा लागतो. आमची कंपनी ही या ठिकाणी असून, अनेक कर्मचारी जीव मुठीत घेऊन दररोज महामार्ग पार करतात. शेकडो नागरिक दररोज येथे ये-जा करत असल्यामुळे एखादा अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने येथे स्काय वॉक किंवा उड्डाणपुलाला पायऱ्या कराव्यात.
राहुल रणपिसे, संचालक, दास एअरकॉन प्रा. लि. कंपनी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT