राजकीय पदाधिकाऱ्याच्या भावाच्या शेतात हुक्का पार्लर file photo
पुणे

Baner Hookah Bar Raid: राजकीय पदाधिकाऱ्याच्या भावाच्या शेतात हुक्का पार्लर; पोलिसांचा छापा, पाच जणांवर गुन्हा

बाणेरमधील ‘फार्म कॅफे’मध्ये सुरू होता हुक्का व्यवसाय; 48 हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे/ बाणेर : औंध-बाणेर लिंक रोडवरील फार्म कॅफेमध्ये सुरू असलेल्या हुक्का विक्रीचा पर्दाफाश करत चतुःशृंगी पोलिसांनी जागामालक, मॅनेजरसह कामगारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या वेळी पोलिसांनी 20 हुक्का पॉट, तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर व इतर साहित्य असा 48 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्वांत गंभीर प्रकार म्हणजे एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या भावाचा हा तरुणाई व्यसनाधिनतेच्या विळख्यात ढकलण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती आहे.(Latest Pune News)

याप्रकरणी, कॅफे मालक अमित वाळके (रा. औंध), मॅनेजर बलभीम कोळी, चालक विक्रमकुमार व्दारकाप्रसाद गुप्ता (वय 23), हुक्का भरणारा वेटर सुरज संजय वर्मा (वय 24) आणि राजकुमार चन्नु अहिरवाल (वय 19, सर्व रा. औंध-बाणेर लिंक रोड, बाणेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिस अंमलदार वाघेश भीमराव कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जागामालक अमित हा राजकीय पदाधिकाऱ्याचा भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबर रोजी चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‌‘कोम्बिंग ऑपरेशन‌’ आयोजित केले होते. तेव्हा तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना औंध बाणेर लिंक रोड वरील एका शेतात हुक्का विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रात्री साडेबारा वाजता सर्व्हे क्रमांक 224 येथील ‌‘फार्म कॅफे‌’वर छापा टाकला. या कॅफेमध्ये ग्राहकांना धूमपानासाठी अवैधरीत्या तंबाखूजन्य हुक्का पुरवला जात असल्याचे पोलिसांना आढळून आले.

दरम्यान, बेकायदेशीरपणे हुक्का बार चालवताना आढळल्याने पोलिसांनी एकूण पाच आरोपींविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये जागामालक, व्यवस्थापक (मॅनेजर) आणि कामगार यांचा समावेश आहे. मुख्य रस्त्यापासून शंभर ते दीडशे मीटर अंतरावर मुळा नदीच्या कडेला हुक्का विक्री सुरू होती. दोन दिवस पोलिसांनी पाळत ठेवून ही कारवाई केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे हे करत आहेत. संबंधित कॅफेचे बांधकाम हे अनाधिकृत असून, त्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, आश्विनी ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलिस अंमलदार बाबासाहेब दांगडे, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, वाघेश कांबळे, तुषार गिरंगे यांनी ही कामगिरी केली.

पोलिसांनी हक्का पार्लरमधील जप्त केलेले हुक्क्याचे साहित्य.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT