टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या घरात कोट्यवधींचे घबाड Pudhari
पुणे

Bandu Andekar Case: टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या घरात 85 लाखांचे दागिने, 2 लाखांची रोकड; पोलिसांच्या हाती काय लागलं?

सोने, चांदी, रोकड, कुलमुखत्यारपत्र, साठे खताचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

Bandu Andekar house police raid crores found

पुणे: आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर याच्या नानापेठेतील घराची पोलिसांनी बुधवारी (दि. 10) घरझडती घेतली. यावेळी तेथून पोलिसांना सोने, चांदी, रोकड, जमिनींची कुलमुखत्यारपत्र, साठे खत अशा गोष्टी मिळून आल्या.

सायंकाळी पाच वाजता सुरू केलेली घर झडती गुरुवारी (दि. 11) पहाटे चारपर्यंत सुरू होती. गुन्हे शाखा, समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. बंडूने घराच्या शंभर मीटर परिसरात 25 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे पोलिसांनी सांगितले. (Latest Pune News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 सप्टेंबर रोजी बंडू आंदेकर याची मुलगी कल्याणी यांचा मुलगा आयुष कोमकर याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. याप्रकरणात बंडू आंदेकर यांच्यासह त्याच्या टोळीतील आठ जणांना पुणे पोलिसांनी पुण्यातून तसेच बुलडाणा येथून अटक केली आहे.

बुधवारी (दि.10) सायंकाळी पाच वाजल्यापासून पहाटे दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.11) 4 वाजेपर्यंत बंडू आंदेकर, अमन पठाण, यश पाटील, वृंदावनी, स्वराज व तुषार (वाडेकर कुटुंबिय) यांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. या झडतील वृंदावनी, स्वराज आणि तुषार यांच्या घरातून 21 हजारांची रोख रक्कम आणि 16 मोबाईल फोन, दागिन्यांच्या पावत्या, एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

तर टोळीचा म्होरक्या बंडू यांच्या घरातून 770 (77 तोळे सोने) ग्राम सोन्याचे दागिने त्याची आजच्या बाजार भावानुसार 85 लाखाहून अधिक किंमत आहे. तर 31 हजारांचे दागिने, 2 लाख 45 हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली. बंडू आंदेकरच्या घरात दहाहून अधिक साठेखत, पॉवर ऑफ अटर्नी, बँकेचे पासबुक, एक कार, विविध करारनामे, टॅक्स पावत्या इतका मुद्दमाल जप्त करण्यात आला आहे.

तब्बल 11 तास पोलिसांकडून ही मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू होती. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा खुनाचा तपास सुरू आहे.

तिथीनुसार वनराज आंदेकर यांचे वर्षश्राध्द

वनराज आंदेकर यांचा खुनाचा बदला घेण्यासाठी हा कट रचल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 1 सप्टेंबर रोजी वनराज आंदेकर यांच्या खूनाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी बंडू आंदेकर आणि त्याच्या घरच्यांनी 22 ऑगस्टला तिथीनुसार त्याचे वर्षश्राध्द केले होते. त्यानंतर देवदर्शनासाठी तिकीट बुक केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात झडती

आयुष कोमकर याचा खुन प्रकरणात मोक्का कारवाई झाल्यानंतर तब्बल 11 तास आरोपींच्या घराची झडती झाल्याची पहिलीच वेळ असून पहिल्यांदाच आंदेकर टोळीच्या घरातून एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे.

तपास गुन्हेशाखेकडे केला वर्ग

खूनाची घटना घडल्यानंतर गुन्हे शाखा आणि समर्थ पोलिस दोन्ही पातळीवर गुन्ह्याचा तपास सुरू होता. नुकताच या प्रकरणात मोक्काची कारवाई करण्यात आल्यानंतर हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT