कुख्यात गँगस्टर बंडू आंदेकरसह सहा जणांना बेड्या; तेरा जणांवर गुन्हा दाखल  Pudhari
पुणे

Bandu Andekar Arrest: कुख्यात गँगस्टर बंडू आंदेकरसह सहा जणांना बेड्या; तेरा जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी बुलडाणामधून चौघांना, तर पुण्यातून दोघांना केली अटक

पुढारी वृत्तसेवा

पुणे: उच्च शिक्षण घेणाऱ्या आपल्या नातवाचा कट रचून गोळ्या झाडून खून घडवून आणणाऱ्या कुख्यात गँगस्टर सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर याला पुणे पोलिसांनी बुलडाणा येथून बेड्या ठोकल्या. या वेळी त्याच्या पाच साथीदारांनाही गुन्हे शाखा व समर्थ पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सूर्यकांत बंडू अण्णा आंदेकर (वय 70,), तुषार नीलंजय वाडेकर (वय 27), स्वराज नीलंजय वाडेकर (वय 23), वृंदावनी नीलंजय वाडेकर (वय 40) यांना बुलडाणा येथून अटक केली आहे. अमन युसुफ पठाण (वय 25, सर्व रा. नाना पेठ), सुजल राहुलू मेरगु (वय 20, भवानी पेठ) या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली. (Latest Pune News)

यापूर्वी या गुन्ह्यात यश सिद्धेश्वर पाटील (वय 19) आणि अमित प्रकाश पाटोळे (वय 19, दोघेही रा. नाना पेठ) यांना अटक केली आहे. असे मिळून या गुन्ह्यात आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे.

आयूष ऊर्फ गोविंद गणेश कोमका (वय 19) याच्या खूनप्रकरणी कल्याणी गणेश कोमकर यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 5 सप्टेंबर रोजी आयुषचा लहान भाऊ ए. डी. कॅम्प परिसरात खासगी क्लाससाठी गेला होता. त्याला घेण्यासाठी आयुष सातच्या सुमारास गेला.

तेथून दोघे दुचाकीवरून परत आले. त्या वेळी आयुषने गाडी पार्क केली. तेवढ्यातच पाठीमागून आलेल्या दोघांनी आयुषवर पिस्तुलातून सलग गोळ्या झाडल्या. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आयुषबदद्ल त्याच्या लहान भावाने जाऊन आईला सांगितले.

लागलीच आयुषला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात त्याला गोळ्या लागून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, आयुषची आई कल्याणी यांनी वडील बंडू आंदेकरसह इतरांविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

मागील वर्षी वनराज आंदेकर यांचा खून

मागील वर्षी रविवारी 1 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतील उदयकांत आंदेकर चौकात वनराज आंदेकर यांचा टोळक्याने पिस्तुलातून गोळीबार करीत आणि कोयत्याने वार करून खून केला होता. आंदेकर आणि कोमकर कुटुंबीयातील मालमत्तेचा वाद आणि टोळीयुद्धातील संघर्षातून हा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते, वनराज आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह 16 आरोपींना अटक केली होती.

चौघांची महत्त्वाची भूमिका

गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असलेले यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे ही दोन नावे गुन्हा दाखल झाल्यानंतर निष्पन्न झाली आहेत. या खुनाच्या गुन्ह्यात अमन, सुजल, यश आणि अमित या चार आरोपींचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग होता. आयुषवर गोळीबार करणे, रेकी करणे यात चौघांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

दोन पिस्तुले जप्त

बंडू आंदेकर याने मुलगी कल्याणी व जावई गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष ऊर्फ गोविंद गणेश कोमकर (वय 19) याचा खून घडवून आणला. आत्तापर्यंत या प्रकरणात आठ आरोपींना अटक केली असून, 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनात गणेश कोमकर हा आरोपी आहे. त्याचाच हा बदला घेतल्याचे पोलिस तपासात समोर आला आहे. गुन्ह्यात आत्तापर्यंत दोन पिस्तुले जप्त केली आहेत. पुढील तपासासाठी सहाही आरोपींना पोलिस कोठडीसाठी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले.

सरकार पक्षाचा युक्तिवाद

आरोपींनी फौजदारी पात्र कट केला असून, त्यांनी पिस्तुलाने गोळीबार करून खुनासारखा गंभीर गुन्हा केला आहे. आरोपी अमन पठाणने यापूर्वीही एका गुन्ह्यात पिस्तूल पुरविले होते. काही आरोपींनी आंबेगाव पठार येथील आंदेकर टोळीचे प्रतिस्पर्धी सोमनाथ गायकवाड व त्यांचे टोळीतील सहआरोपी यांच्या घराची रेकी केली.

आरोपींचा गुन्हा करण्याचा उद्देश काय होता, याबाबत तपास करायचा आहे. अटक आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल व त्यामधील राउंडसह विविध मुद्द्‌‍यांच्या आधारे गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी केला. तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे यांनी गुन्ह्याच्या तपासाबाबतची माहिती न्यायालयास दिली.

बचाव पक्षाचा युक्तिवाद

खून झालेला मुलगा बंडू आंदेकर यांचा नातू आहे. वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणात या गुन्ह्यातील फिर्यादीचे कुटुंबीय हे आरोपी आहेत. त्यामुळे या गुन्ह्यात आंदेकर आणि वाडेकर कुटुंबीयांना आरोपी करण्यात आले आहे. आंबेगाव पठार येथील रेकी प्रकरणात आमचे नाव नाही. या गुन्ह्यात काही जप्त करायचे बाकी नाही. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, असा बचाव ॲड. मिथुन चव्हाण, ॲड. मनोज माने आणि ॲड. प्रशांत पवार यांनी केला.

आरोपींच्या कलमात वाढ

अमन पठाण व यश पाटील यांनी भवानी पेठ येथील एका पार्किंगमध्ये पिस्तूलने फायरिंग करून खून करून ‌’इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच‌’ अशी घोषणा देत दहशत माजवली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुसार कलमवाढ केल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.

गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींचा सहभाग

बंडू आंदेकर हा आंदेकर टोळीचा प्रमुख असून, त्याच्यावर यापूर्वी 9 गुन्हे दाखल आहेत. खून, मारामारी, बेकायदा जमाव जमवून दंगल माजविणे, बदनामी करणे, फसवणूक, खंडणी, बनावट दस्तऐवज करून फसवणूक तसेच कट रचून खुनाचा प्रयत्न करणे या स्वरूपाच्या गुन्ह्याचा समावेश आहे. याखेरीज वाडेकर, पठाण, पाटील, पाटोळे, मेरगू यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर, स्वराज वाडेकर व यश पाटील यांच्याविरोधात अल्पवयीन असताना खून तसेच खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे.

आरोपींना 15 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

आयुष कोमकर याचा खून करून माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अमन पठाणने शस्त्रे पुरविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या खून प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी सहा जणांना अटक करून या आरोपींना मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. बडवे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत 15 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

गुन्ह्याशी संबंध नाही: बंडू आंदेकर

न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी बंडू आंदेकर यांनी पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का? असे विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की, हा सर्व प्रकार घडला तेव्हा मी केरळला होतो. चौकशीसाठी बोलावत मला अटक करण्यात आली. मला या गुन्ह्यात गोवण्यात आले असून, यात माझा काहीही संबंध नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT