पुणे

बंद ‘यशवंत’च्या निवडणुकीत चुरस; बिनविरोधचे प्रयत्न निष्फळ

Laxman Dhenge
उरुळी कांचन/लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा : सुमारे तेरा वर्षांपासून बंद असलेल्या हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दोन तुल्यबळ पॅनेल जाहीर झाल्याने बिनविरोध निवडणूक होण्याचा प्रयत्न असफल झाला असून, आता दोन तुल्यबळ पॅनेल रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा मंगळवार (दि. 27) हा अखेरचा दिवस होता.  9 मार्चला मतदान होणार असून, दुसर्‍या दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. बंद असलेला हा कारखाना सुरू करण्याची कोणती योजना कोणत्या पॅनेलकडे आहे, हा या निवडणुकीतील मुख्य मुद्दा आहे.
कारखान्याची ही निवडणूक तब्बल 15 वर्षांनंतर होत आहे. 2010-11 च्या गळीत हंगामात संचालक मंडळावर बरखास्तीची कारवाई झाल्यानंतर सलग 13 वर्षे प्रशासकराज आहे. काही  सभासदांनी  मुंबई उच्च न्यायालयात जाऊन निवडणुकीचा आदेश मिळविला आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी  महिनाभर प्रयत्न केले होते, ते असफल ठरल्याने अखेर दोन पॅनेलची घोषणा झाली. काही माजी संचालक व प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
माजी उपाध्यक्ष रोहिदास उंद्रे, राजीव घुले, सुभाष जगताप, बाजार समितीचे माजी संचालक आप्पासाहेब रंगनाथ काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेत्रे, पुणे अडते फुलबाजार संघटनेचे माजी अध्यक्ष एम. एस. चौधरी, भाजपचे युवानेते अजिंक्य कांचन, सुनील कांचन, नवनाथ काकडे, अमित कांचन, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन, दौंड पंचायत समितीचे माजी सभापती सुशांत दरेकर आदी प्रमुख रिंगणात आहेत.

कारखाना कोण करणार सुरू?

तालुक्यातील सर्व सहकारी चळवळच कारखान्यामुळे अडचणीत आली. तेरा वर्षांत सर्वच राजकीय पक्षांनी कारखाना सुरू करण्याची आश्वासने दिली. त्यांची सरकारे आली गेली; परंतु आश्वासने हवेत विरली. आता या निवडणुकीत कारखाना लवकरात लवकर कोण सुरू करणार, दोन्ही पॅनेलपैकी कोणाकडे चांगली योजना आहे, कोणामध्ये धमक आहे, हाच एकमेव मुद्दा आहे. यावर पॅनेल कशी तयारी करतात, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT