पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ येथील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर पुणे पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील मालदा येथून आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. त्याला लवकरच पुण्यात आणण्यात येणार आहे. हा ड्रग तस्करीतील मास्टरमाइंड संदीप धुनिया व इतर मुख्य आरोपींच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यापूर्वी वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (40, खडीचे मैदान, सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसिया (35, रा. हरकानगर, भवानी पेठ), हैदर नूर शेख (40, रा. भैरवनगर, विश्रांतवाडी), भीमाजी परशुराम साबळे (46,रा. पिंपळे सौदागर, पुणे), युवराज बब—ुवान भुजबळ (41, रा. गरिबाचा वाडा, महात्मा फुले रोड, डोंबीवली पश्चिम, मुंबई), तर दिल्ली येथून दिवेश भुतिया (39) आणि संदीप कुमार (42, दोघेही रा. दिल्ली), आयुब अकबर मकानदार (रा. सांगली) यांना अटक करण्यात आली आहे. तर, मंगळवारी पुणे पोलिसांनी पश्चिम बंगाल येथून सुनील बर्मन नावाच्या एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याचा या प्रकरणात सक्रिय सहभाग आढळल्यास त्याला अटक होण्याचीही दाट शक्यता वर्तवली जात आहे.
कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थकेम लॅबोरटरीज येथे छापा टाकल्यानंतर पुणे पोलिसांना 718 किलो मेफेड्रॉन सापडले. येथून देशातील विविध भागांत मेफेड्रॉन पाठविल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दहा ते पंधरा पथके तयार करून पोलिसांनी दिल्लीसह राज्यातील विविध भागांत छापे टाकले. दिल्लीत मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला. दहा-दहा किलोच्या पॅकेटने फूड डिलिव्हरीच्या माध्यामातून मेफेड्रॉन लंडनला पाठविले जात होते. मागील दोन वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू होता. विदेशात मेफेड्रॉनची विक्री करण्याची मदार धुनियावर होती. धुनिया यानेच मुंबईतील एका व्यक्तीशी संपर्क केला होता. सुरुवातीला पोलिसांनी डिलिव्हरी करणार्यांची साखळी उद्ध्वस्त केली. त्यानंतर निर्मिती करणारे युनिट आणि साठवणूक करणारी ठिकाणे शोधून काढली. दिल्लीतून 918 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. गुन्ह्याचा मास्टरमाइंड संदीप धुनिया हा नेपाळमार्गे फरार झाला आहे.
आयुब अकबर मकानदार याला सांगलीतून अटक करण्यात आली. त्याच्याकडून 300 कोटींचे 148 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. मकानदार हा धुनियासोबत 2016च्या ड्रगच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात जेरबंद होता. तर, सुनील बर्मन हा सात फरार आरोपींपैकी एक असून, तो यापूर्वी पुण्यात येऊन गेला होता. तो सातत्याने इतर आरोपींच्या संपर्कात होता.
हेही वाचा