Banana Pudhari
पुणे

Pune Banana Price: होर्मुझमधील संघर्षाचा केळी निर्यातीला फटका; घाऊक दर निम्म्यावर, किरकोळ बाजारात मात्र महागाई कायम

गुलटेकडी मार्केट यार्डात केळीचे दर प्रतिकिलो ६ ते १० रुपयांवर; निर्यातीत अडथळ्यांमुळे शेतकरी अडचणीत, ग्राहकांना डझनासाठी ५० ते ६० रुपये मोजावे लागत आहेत

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: 'गरिबांचे फळ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केळीच्या बाजारपेठेला निर्यातीतील अडथळ्यांचा मोठा फटका बसला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनी परिसरातील संघर्षामुळे समुद्रमार्गे होणारी वाहतूक विस्कळीत झाली असून, केळी निर्यातीला मोठी खीळ बसली आहे.

परिणामी, निर्यातक्षम दर्जाची केळी देशांतर्गत बाजारपेठेकडे वळली आहेत. मात्र, नवरात्रोत्सवानंतर मागणी घटल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात केळींचे दर निम्म्यावर आले आहेत. विशेष म्हणजे, घाऊक बाजारात केळी स्वस्त झाली असताना किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांना चढ्या दरानेच खरेदी करावी लागत आहे.

मार्केट यार्डात प्रामुख्याने इंदापूर, टेंभुर्णी, पंढरपूर आणि अकलूज परिसरातून केळींची आवक होते. एरवी दररोज दोन टन क्षमतेच्या २० ते २५ गाड्यांमधून केळी दाखल होतात. मात्र, सध्या मागणीअभावी व्यापाऱ्यांनी माल मागविण्याचे प्रमाण कमी केल्याने आवक १५ ते २० गाड्यांवर आली आहे. निर्यातीतील अडचणींमुळे उत्तम प्रतीची केळी स्थानिक बाजारात उपलब्ध होत असली, तरी अपेक्षित उठाव मिळत नाही.

परिणामी, पूर्वी प्रतिकिलो १५ ते २० रुपये असलेले घाऊक दर आता अवघ्या ६ ते १० रुपयांपर्यंत घसरले आहेत. दुसरीकडे, किरकोळ बाजारात मात्र डझनाला ५० ते ६० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ दरांतील मोठी तफावत चर्चेचा विषय ठरली आहे. ऑक्टोबर महिना भारतीय केळी निर्यातीसाठी महत्त्वाचा असतो. या काळात इराणसह मध्यपूर्वेतील देशांकडून मागणी वाढते. मात्र, होर्मुझ परिसरातील संघर्षामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. निर्यातदारांना वाढलेला वाहतूक खर्च, माल पोहोचण्यास लागणारा अतिरिक्त कालावधी यांचा सामना करावा लागत आहे.

नवरात्रोत्सवानंतर केळीची मागणी मंदावली आहे. मागणीनुसार घाऊक बाजारात केळी मागविण्यात येत आहे. त्यात निर्यातीतील अडथळ्यांमुळे दर्जेदार केळी स्थानिक बाजारात येत आहेत. मात्र, अपेक्षित मागणीअभावी एरवी ऑक्टोबर महिन्यात मिळणारे केळींचे दर सध्या निम्म्यावर आले आहेत. मात्र, किरकोळ बाजारात त्या प्रमाणात दर कमी झालेले दिसत नाहीत. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ दरांमध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.
अनिकेत वायकर, घाऊक केळी व्यापारी, मार्केट यार्ड
होर्मुझ परिसरातील वाहतुकीच्या अडथळ्यांमुळे निर्यातीचे गणित बिघडले आहे. निर्यातीसाठी तयार केलेला दर्जेदार माल स्थानिक बाजारात विकावा लागत आहे. मात्र, त्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळत नाही. निर्यातीला ३० ते ३५ रुपये मिळणारा दर स्थानिक बाजारात आठ ते दहा रुपयांवर आला आहे. खत, मजुरी, वाहतूक आणि पॅकिंगचा खर्च कायम असताना दर घसरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. निर्यात वाहतूक सुरळीत होणे गरजेचे आहे.
नीलेश वाघमोडे, केळी उत्पादक शेतकरी, इंदापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT