गणेश खळदकर
पुणे: इंग्रजी विषयाचे पुस्तक केवळ पाठांतरापुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेची पायाभरणी अधिक मजबूत करायची आणि ऐकणे, बोलणे, वाचन, लेखन, विचारमंथन आणि सर्जनशील अभिव्यक्ती या सर्व कौशल्यांचा समतोल विकास घडवून आणायचा या उद्देशाने इयत्ता चौथीच्या इंग्रजीच्या पुस्तकाची निर्मिती केली आहे. त्यामुळे विद्यार्थी भाषेपलीकडे जाऊन ही भाषा आत्मविश्वासाने बोलू लागतील, असे चित्र स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या माध्यमातून यंदा हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या नवीन पुस्तकांची भेट विद्यार्थ्यांना यंदा देण्यात येणार आहे. चौथीच्या इंग्रजीच्या पुस्तकात चार युनिट असून, प्रत्येक युनिटमध्ये १० अशा एकूण ४० प्रकरणांचा समावेश केला आहे.
पुस्तकाची सुरुवातच बॅक टू स्कूल या प्रकरणाने झाली आहे. संत गाडगे महाराज, धनराज पिल्ले, महाराष्ट्र दिन, खरा मित्र, मी प्रथम भारतीय, योगा, सिव्हिक सेन्स, नाही म्हणायला शिका आदी धड्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौध्दिक प्रगल्भता विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. पुस्तकातील धडे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित ठेवण्यात आले आहेत. कुटुंब, मित्र, शाळा, निसर्ग, प्राणी- पक्षी, प्रवास, खेळ, सण आणि सामाजिक मूल्ये या विषयांवर आधारित विविध कथा, कविता, संवाद आणि उपक्रमांचा समावेश आहे. इंग्रजी शिकवताना चार मूलभूत कौशल्यांवर विशेष भर देण्यात आला आहे. यामध्ये ऐकणे या प्रकारात शिक्षकांचे वाचन, गोष्टी आणि संभाषणे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचे आहे. बोलणे या प्रकारात स्वतःची ओळख, प्रश्नोत्तरे, लहान संवाद आणि अनुभव मांडण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. वाचन या प्रकारात कथा, कविता आणि माहितीपर मजकूर समजून घेऊन एकट्याने किंवा समूहाने वाचणे गरजेचे आहे. तर, लेखन या प्रकारात शब्द, वाक्य, परिच्छेद आणि लहान लेखन विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे.
पुस्तकात विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने भाषा शिकवण्यासाठी विविध कथा आणि कविता देण्यात आल्या आहेत. या कथांमधून मैत्री, सहकार्य, प्रामाणिकपणा, पर्यावरण संवर्धन, वेळेचे महत्त्व आणि जबाबदारी यांसारखी मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांची इंग्रजी शब्दसंपदा वाढविण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम समाविष्ट केले आहेत. यामध्ये नवीन शब्द ओळखणे, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, शब्दजोडी तयार करणे, चित्रांच्या आधारे शब्द शिकणे, रिकाम्या जागा भरणे, शब्दकोडी आणि भाषिक खेळ याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येणार आहे. चौथीच्या स्तरानुसार व्याकरणाचे प्राथमिक घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिकवले जाणार आहेत. यामध्ये नाम, सर्वनाम, क्रियापदे, विशेषणे, प्रश्न तयार करणे, विरामचिन्हांचा वापर कसा करायचा, हे शिकवून विद्यार्थ्यांचा इंग्रजी व्याकरणाचा पाया पक्का केला जाणार आहे.
पुस्तकात केवळ वाचनावर भर नसून विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविणारे उपक्रम दिले आहेत. यामध्ये भूमिका नाट्य, समूहचर्चा, चित्रवर्णन, गाणी आणि कृतिगीत, प्रकल्पाधारित उपक्रम, निरीक्षण आणि सादरीकरणात विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांचे संवाद कौशल्य वाढवणार आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा केवळ विषय म्हणून नव्हे, तर संवादाचे माध्यम म्हणून वापरता यावी, यासाठी दैनंदिन परिस्थितींवर आधारित संभाषणे देखील पुस्तकात दिली आहेत. शाळेतील संवाद मित्रांशी बोलणे, वस्तूंची माहिती सांगणे, दिशा सांगणे, आवडी-निवडी व्यक्त करणे यावर भर दिला आहे. पुस्तकाची मांडणी विद्यार्थीकेंद्री शिक्षणावर आधारित असून, अनुभवातून शिकणे, विचारशक्ती विकसित करणे, भाषा आत्मविश्वासाने वापरणे आणि आनंददायी शिक्षण यावर भर दिला आहे. इंग्रजी विषयात चांगली प्रगती होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करणे, मोठ्याने बोलण्याचा सराव करणे, घरात साधे इंग्रजी संभाषण करणे गरजेचे आहे. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना आत्मविश्वासाने इंग्रजी बोलता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मराठी शब्दसंग्रहाची जोड हवी
विद्यार्थ्यांना इयत्ता चौथीमध्येच इंग्रजी भाषा चांगल्या पद्धतीने बोलायला शिकवायची असेल, तर त्यांना ठराविक इंग्रजी शब्दांना मराठीत काय म्हणतात ते कळायला हवे. त्यासाठी या पुस्तकात मराठी शब्दसंग्रहाची जोड आवश्यक होती. तसेच, व्याकरणाचा पाया पक्का करण्यासाठी व्याकरणात नाम, सर्वनाम, विशेषणे यांसह विविध काळ आणि छोटी छोटी वाक्ये तयार करून घेणे गरजेचे असल्याचे मत पुस्तक परीक्षणासाठी दिलेल्या भाषा तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.