गणेश खळदकर
पुणे: सहावीचे मराठीचे पुस्तक केवळ पाठांतरावर आधारित नसून, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याबरोबरच देशप्रेम, सामाजिक जाणीव, सर्जनशीलता, नैतिक मूल्ये आणि वाचनसंस्कृती रुजवायची आणि विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण आणि जीवनकौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न करायचा या उद्देशाने इयत्ता सहावीच्या मराठीच्या पुस्तकाची निर्मिती बालभारतीने केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या माध्यमातून यंदा हिरक महोत्सवी वर्षानिमित्त दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या नवीन पुस्तकांची भेट विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. सहावीच्या मराठीच्या पुस्तकाचे चार भागात वर्गीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक भागात पाच अशा एकूण २० प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. सहावीच्या मराठी 'बालभारती' पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांच्या भाषिक, वैचारिक, सामाजिक आणि सर्जनशील विकासाला चालना देणारे विविध प्रकारचे धडे, कविता, चरित्रे, माहितीपर लेख आणि उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
पुस्तकाची सुरुवात जगदीश खेबूडकर यांच्या सत्य शिवाहून सुंदर हे या प्रार्थनेने झाली आहे. पुस्तक माझा गुरू या पाठात पुस्तकांचे महत्त्व सांगितले आहे. पुस्तक हे केवळ माहितीचे साधन नसून, ते आयुष्यभर मार्गदर्शन करणारे गुरू आहे, हा मुख्य विचार आहे. अनुभवाच्या खाणी या पाठात अनुभव हेच सर्वात मोठे ज्ञान असल्याचे सांगितले आहे. प्रकाशयात्री हा पाठ विज्ञान, संशोधन आणि मानवाच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या वैज्ञानिक वृत्तीवर आधारित आहे. राष्ट्रध्वज माझा अभिमान या पाठात भारतीय राष्ट्रध्वजाचे महत्त्व, त्याचा इतिहास आणि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी समजावून सांगितली आहे. चांदोबास पत्र हा पाठ कल्पनारम्य आणि भावविश्व समृद्ध करणारा आहे. यात एक मूल चंद्राशी संवाद साधत असल्याप्रमाणे पत्र लिहिते. लोकनृत्ये या पाठात भारतातील आणि महाराष्ट्रातील विविध लोकनृत्यांची माहिती दिली आहे. हे तिन्ही पाठ विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सर्जनशील विचार, निसर्गप्रेम आणि सांस्कृतिक जाणीव विकसित करण्यावर भर देतात. धाडसी रोहन या पाठात रोहन नावाच्या मुलाची प्रसंगावधान, धैर्य आणि जबाबदारीची जाणीव दाखवली आहे. रक्षण पर्यावरणाचे या पाठात पर्यावरणाचे संरक्षण का आवश्यक आहे, हे सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. आंब्याचा मोहोर हा पाठ निसर्ग, ऋतू आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित आहे.
खरी संपत्ती या पाठात पैशापेक्षा माणुसकी, प्रामाणिकपणा, ज्ञान आणि चांगले संस्कार यांचे महत्त्व सांगितले आहे. विचारधन या पाठात विचारांची ताकद आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व सांगितले आहे. या पाठांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, पर्यावरण-जागरूकता, निसर्गप्रेम, नैतिक मूल्ये आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची, निरीक्षण करण्याची आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची प्रेरणा विकसित करण्यात येणार आहे. तसेच धैर्य, प्रामाणिकपणा, सकारात्मक विचार, सामाजिक जबाबदारी आणि चांगले संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रूजावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पुस्तकातील आला पाऊस, खोप्यामध्ये खोपा, गीत मराठी गाऊ या, भल्लगडी दादा, फिटे अंधाराचे जाळे हा देश माझा या कवितांमुळे वर्गात बहर येणार आहे. एकंदरीतच मराठीचे हे पुस्तक पाठांतराचे पुस्तक' नसून, 'जीवनाशी जोडून शिकवणारे पुस्तक' असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नव्या पुस्तकातील बदल काय आहेत?
पाठांतराऐवजी आकलन आणि कृतीवर भर
छोट्या उपक्रमांचा समावेश
संभाषण, लेखन आणि सादरीकरण कौशल्यांना प्राधान्य
स्थानिक संस्कृती, पर्यावरण आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेले विषय
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणारे उपक्रम