गणेश खळदकर
पुणे: विद्यार्थ्यांना पृथ्वी, पर्यावरण, हवामान, नकाशे, नैसर्गिक संसाधने आणि मानवी जीवन यांचा परस्पर संबंध समजावून सांगायचा आणि पर्यावरण संरक्षण, जलसंवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि नैसर्गिक आपत्तींबाबत सजग नागरिक घडविण्याचा प्रयत्न करायचा, या उद्देशानेच बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या भूगोल पुस्तकाची निर्मिती करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या माध्यमातून यंदा हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या नवीन पुस्तकांची भेट विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. सहावीच्या भूगोलाच्या या पुस्तकात एकूण ११ प्रकरणांचा समावेश आहे. मैत्री भूगोलाशी या प्रकरणाने पुस्तकाची सुरुवात झाली असून, शाश्वत विकासाची दिशा या प्रकरणाने शेवट झाला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता, भौगोलिक विचारक्षमता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने प्रत्येक प्रकरणात चित्रे, नकाशे, तक्ते, उपक्रम आणि स्वाध्यायाचा समावेश करण्यात आला आहे. मैत्री भूगोलाशी या प्रकरणात भूगोल ही संकल्पना, भूगोल अभ्यासाचे स्त्रोत याविषयी माहिती देण्यात आली आहे. भारतीय भूगोलाचा इतिहास या प्रकरणात पृथ्वी, द्विप, ग्रहण, दिशा व वेळ, वातावरण व ऋतू याविषयी माहिती देण्यात आली आहे. शिलावरण या प्रकरणात पृथ्वीचे अंतरंग, पृथ्वीच्या अंतरंगातील थर, प्रमुख भूरुपे, याविषयी माहिती देण्यात आली आहे. वातावरण या प्रकरणात वातावरणातील घटक, वातावरणाचे थर यांची माहिती विद्यार्थ्यांना समजणार आहे. जलावरण व जीवावरण या प्रकरणात महासागर, भूखंडमंच, सागरी डोह आणि सागरी गर्ता, भरती व ओहोटी याविषयी माहिती देण्यात आली आहे.
मानवीवस्ती या प्रकरणात प्राकृतिक घटक, सामाजिक व सांस्कृतिक घटक, मानवी वस्त्यांचे बदलते स्वरूप यांविषयी माहिती देण्यात आली आहे. तर शाश्वत विकास या शेवटच्या प्रकरणात पर्यावरणाचे संतूलन टिकवून ठेवण्यासाठी हवा, जल, जमीन, सूर्य या चारही घटकांचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात येणार आहे. हे पाठ्यपुस्तक केवळ भौगोलिक माहिती देणारे पुस्तक नसून, विद्यार्थ्यांना पृथ्वी, पर्यावरण आणि मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. नकाशे, चित्रे, कृती, प्रयोग आणि स्थानिक उदाहरणांच्या माध्यमातून भूगोल हा विषय रंजक व जीवनोपयोगी बनविण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भूगोलात तंत्रज्ञानावर भर हवा होता
इंटरनेट आणि उपग्रहांमुळे जग फार जवळ आले आहे. त्यामुळे भौगोलिक सीमा धुसर झाल्या असून, भूगोलाचा अभ्यास करण्याचे तंत्रच बदलले आहे. जीपीएस, मॅप, गुगल आणि एआयचा वापर भूगोलाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासणे गरजेचे आहे. त्यामुळेच या पुस्तकात तंत्रज्ञानावर अधिक भर गरजेचा होता. प्रत्यक्षात मात्र तो दिसत नसल्याची खंत पुस्तक परीक्षणासाठी दिलेल्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.