Bajra Bhakri Pudhari
पुणे

Bajra Bhakri: थंडी वाढताच ‘बाजरीच्या भाकरी’ची धडाकेबाज एन्ट्री!

उष्णता, चव आणि आरोग्याचा परफेक्ट संगम; गावी-शहरी भागात झपाट्याने वाढली मागणी

पुढारी वृत्तसेवा

काटेवाडी: वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांच्या आहारात लक्षणीय बदल दिसून येत आहे. थंड हवामानात शरीराला उष्णता देणारे, पचायला हलके आणि आरोग्यवर्धक पदार्थांकडे लोकांचा ओढा वाढला असून, ग््राामीण भागात बाजरीची मागणी वाढली आहे.

सध्या लोक जेवणात बाजरीची भाकरी लसूण-चटणी, वांग्याचे भरीत, देशी तूप आणि कडधान्याची आमटी सोबत घेत आहेत. यामुळे बाजरीच्या भाकरीची थंडीमध्ये चव अधिक गोड आणि रुचकर झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घसरण झाल्यामुळे शरीरातील उष्णता टिकवण्यासाठी पारंपरिक आहार पुन्हा लोकप्रिय होत आहे.

पोषणतज्ज्ञांच्या मते, थंडीत बाजरीचे सेवन अतिशय उपयुक्त ठरते. बाजरीमध्ये लोह, कॅल्शियम, फायबर आणि जीवनसत्व मुबलक प्रमाणात असल्याने ती पचनसंस्थेसाठी हितकारक असून, शरीराला उष्णता प्रदान करते. त्यामुळे नागरिकांच्या जेवणात बाजरीच्या भाकरीचा समावेश लक्षणीयपणे वाढला आहे.

बाजारपेठेतही याचा परिणाम जाणवत असून, किराणा दुकानदारांकडून बाजरीच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, या काळात बाजरीच्या पीक विक्रीला चांगला भाव मिळत असून, मागणीही वाढत चालली आहे. अनेक गृहिणी थंडीत पोळ्यांच्या ऐवजी बाजरीची भाकरी, भाजलेल्या कांद्याची चटणी आणि गरमागरम भरीताला प्राधान्य देत आहेत.

थंडीचा जोर वाढत असताना पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे पुनरुज्जीवन सुरू झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. आरोग्यदायी, चविष्ट आणि ऊर्जा देणारे बाजरीचे पदार्थ आगामी काळातही नागरिकांच्या आहारात महत्त्वाचे स्थान टिकवून ठेवतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

या आठवड्यात बाजरीची विक्री वाढली आहे. थंडी वाढली की, लोक गहू किंवा तांदळापेक्षा बाजरीला जास्त पसंती देतात. अनेक ग््रााहकांनी रोजच्या आहारात बाजरीची भाकरी सुरू केली आहेत. परिसरातील साखर कारखाना गळीत हंगाम सुरू झाल्याने ऊसतोड मजुरांमुळे बाजरीची मागणी वाढली आहे.
हनुमंत पांडुरंग ठोंबरे, किराणा दुकानदार, काटेवाडी (ता. बारामती)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT