केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (File Photo)
पुणे

Amit Shah | बाजीरावांनी २० वर्षांत ४१ लढाया जिंकल्या, त्यांच्या पुतळ्यासाठी एनडीएतील जागा योग्य : अमित शहा

खडकवासला येथील एनडीएमधील थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे अनावरण

अविनाश सुतार

Bajirao Peshwa statue NDA

पुणे: स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी पुण्यातून एल्गार पुकारला होता. १७ व्या शतकात पुण्यातून स्वातंत्र्याचा हुंकार पुकारण्यात आला. थोरले बाजीराव पेशवेंचा पुतळा माझ्याही गावात आहे. पुणे स्वराज्याच्या संस्काराचे उगमस्थान आहे. बाजीरावांची प्रेरणा अनेका मिळत राहिल. त्यामुळे त्यांचा पुतळा होण्यासाठी एनडीएचीच जागा योग्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

पुण्यातील खडकवासला येथील एनडीएमधील थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे अनावरण गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज (दि. ४) करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार मेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

शहा पुढे म्हणाले की, बाजीराव यांच्या पुतळ्यापासून अनेकांना प्रेरणा मिळेल. काही युद्धनीती कालबाह्य होत नाहीत. सध्याची युद्धनीती आणि बाजीरावांची युद्धनीती यामध्ये साम्य आहे. बाजीरावांनी २० वर्षांत ४१ लढाया लढून त्या सर्व जिंकल्या. पराभव निश्चित मानल्या जाणाऱ्या लढाया बाजीरावांनी जिंकल्या. त्यामुळे त्यांच्यासारखा सेनापती दुसरा नाही. त्यांचे संपूर्ण आयुष्य लढाया लढण्यात गेले. त्यांनी मिळविलेला विजय कल्पने पलिकडचा होता.

मराठा साम्राज्याचे तुकडे झाले तरी, पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेण्याचे महत्त्वाचे काम केले. त्यांनी शेजारच्या संस्थांनातही प्रशासन उत्तम राबविले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची कल्पना केली, तेव्हा भूगोल वेगळा होता. शिवरायांच्या वारसांनी स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. शिवरायांनंतर संभाजी महाराज, ताराराणी यांनी परंपरा पुढे नेली. बुंदेलखंड, तंजावर, गुजरातपासून अफगाणिस्तान, अटक, कटकपर्यंत स्वराजाचा विस्तार केला. निजामविरोधातील पालखेडचा मराठ्यांचा विजय अविस्मरणीय आहे. मी जेव्हा निराश होतो. तेव्हा छत्रपती शिवराय आणि बाजीरावांचा इतिहास आठवतो. बाजीरावांचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. बाजीरावांकडे एक शिपाई आणि तीन घोडे होते.

योद्ध्यांचा, स्वातंत्र्यसेनानींचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, थोरले बाजीराव पेशवे यांची लढाई जिंकण्यामध्ये एक विशेष रणनिती होती. त्यांचा सेना एका दिवसामध्ये ८ ते १० किलोमीटर प्रवास करायची.अशा प्रकारची सेना तयार करून त्यांनी आपले युद्ध कौशल्य सिद्ध केले होते. परंतु इंग्रजांनी आणि त्यानंतर काही प्रमाणात स्वकीयांनी इतिहासातील नायकांवर अन्याय केला. किंबहुना आपल्या हिंदवी स्वराज्य आणि मराठ्यांचा इतिहास डिलिट करून टाकला. मुघलानंतर इंग्रज आले. त्यामुळे आपल्य़ा अनेक महानायकांचा विसर पडला. परंतु आज देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इतिहासातील अनेक नायकांचा, योद्ध्यांचा, स्वातंत्र्यसेनानींचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT