गावोगावी बैलपोळ्याचा थाट हरवला; संस्कृतीचा सण केवळ औपचारिकतेपुरता उरला  Pudhari File Photo
पुणे

Bail Pola: गावोगावी बैलपोळ्याचा थाट हरवला; संस्कृतीचा सण केवळ औपचारिकतेपुरता उरला

खरीप पिकांच्या कामाचा मुख्य टप्पा संपल्यानंतर शेतकरी आपल्या मेहनतीच्या साथीदार बैलांना विश्रांती देऊन पूजन करतात, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतात.

पुढारी वृत्तसेवा

रामदास डोंबे

खोर: महाराष्ट्रात बैलपोळा हा दोन वेळा साजरा केला जातो. त्यात श्रावणी पोळा आणि भाद्रपदी पोळा या दोन परंपरा आहेत. विदर्भ, मराठवाडा व खानदेश भागात श्रावणी पोळ्याला मोठे महत्त्व आहे, तर पश्चिम व मध्य महाराष्ट्रात भाद्रपदी पोळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. खरीप पिकांच्या कामाचा मुख्य टप्पा संपल्यानंतर शेतकरी आपल्या मेहनतीच्या साथीदार बैलांना विश्रांती देऊन पूजन करतात, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतात.

मात्र, आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धती बदलल्या आहेत. ट्रॅक्टर, यंत्रसामग्री, रासायनिक खते, ठिबक सिंचन यामुळे बैलांचा वापर कमी होत चालला आहे. परिणामी बैलांची संख्या घटली असून गावोगावी बैलांच्या जोड्या क्वचितच दिसतात. त्यामुळे बैलपोळ्यासारखा पारंपरिक सण आज केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित राहिल्याचे चित्र आहे.  (Latest Pune News)

पूर्वी गावागावांत दोन-तीन बैलजोड्या प्रत्येक शेतकर्‍याकडे असत. बैलांची सजावट, पूजा, मिरवणुका, गाड्यांची सजावट या सणाची खरी शान होती. आज मात्र काही मोजक्या शेतकर्‍यांकडेच बैल असल्याने गावातील पोळ्याचा उत्साह मंदावलेला दिसतो. शहरांकडे स्थलांतरित झालेल्या तरुणाईमुळेही या परंपरेत सहभाग कमी झाला आहे. सणाच्या दिवशी शेतकरी बैलांना स्नान

घालतात, शिंगांना रंग लावतात, फुलांच्या माळा, गोधडी, गोंडे, झुलांनी सजवतात आणि पूजन करून मिरवणूक काढतात. पूर्वी हा सण केवळ बैलांचा नव्हता, तर तो शेतकर्‍याच्या भावनांचा आणि संस्कृतीचा सण होता. आज मात्र मोबाईलवर शेअर केलेले फोटो-व्हिडिओ आणि प्रतीकात्मक पूजा एवढ्यावरच तो मर्यादित झालेला आहे.

परंपरा जपण्याची गरज

बैलपोळा हा शेतकरी संस्कृतीचा आत्मा आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच या परंपरा टिकवण्यासाठी युवक व समाजाने पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा काही वर्षांत बैलपोळा हा केवळ इतिहासाच्या पानांतच वाचायला मिळेल, ही खेदजनक बाब आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT