पुणे

अंगावर कुत्री सोडणार्‍याचा जामीन फेटाळला

अमृता चौगुले

पुणे; पुढाली वृत्तसेवा : सदनिकेचा विद्युतपुरवठा बंद केल्याच्या कारणावरून महावितरणच्या महिला कर्मचार्‍यांच्या अंगावर कुत्री सोडून त्यांना डांबून ठेवणार्‍या शासकीय कर्मचार्‍याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांच्या न्यायालयाने फेटाळला. ललित बोदे (रा. सरस्वती अपार्टमेंट, प्रभात रोड, डेक्कन) असे अटकपूर्व जामीन फेटाळलेल्याचे नाव असून, तो शासकीय कर्मचारी आहे. 27 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.

याबाबत, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या 35 वर्षीय वरिष्ठ तंत्रज्ञ महिलेने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेच्या दिवशी त्या सहकारी महिलेबरोबर प्रभात रस्त्यावरील सरस्वती अपार्टमेंटमधील सदनिका क्र. 301 चे वीजबिल थकल्याने त्याच्या वसुलीसाठी गेल्या होत्या. या वेळी, वीजपुरवठा बंद केल्याच्या कारणावरून ललित बोदे व त्यांच्या पत्नीने अर्वाच्य भाषेत उद्धट बोलून अंगावर कुत्रे सोडले. तसेच जिन्यामध्ये डांबून ठेवत सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी बोदे याने न्यायालयात अर्ज केला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी त्यास विरोध केला. आरोपींना कायद्याची भीती दिसून येत नाही. फिर्यादींच्या अंगावर कुत्री सोडल्यामुळे त्यांच्या जीवास हानी पोहोचविण्याचा आरोपींचा उद्देश होता. ललित बोदे हा शासकीय कर्मचारी असूनही त्याने शासकीय कर्मचार्‍यांना काम करण्यापासून जाणीवपूर्वक रोखल्याने गुन्ह्याचे गांभीर्य वाढले आहे. आरोपीची पोलिस कोठडी घेतल्यानंतरच गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊ शकतो, असा युक्तिवाद अ‍ॅड. अगरवाल यांनी केला. न्यायालयाने तो मान्य करत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT