KK Muhammad Pudhari
पुणे

KK Muhammad Ayodhya Excavation: अयोध्येतील उत्खननात मंदिराचे पुरावे १९७६-७७ मध्येच सापडले होते: के. के. मुहम्मद

डेक्कन अभिमत विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञांचा दावा; २००३च्या उत्खननातही महत्त्वाचे अवशेष सापडल्याचे सांगितले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अयोध्येत मशिदीखाली राम मंदिर आहे, याचे पुरावे आम्ही १९७६-७७ साली पहिल्याच उत्खननातच शोधले होते. त्यानंतर पुन्हा २००३ मध्ये तेथे उत्खनन करण्यात आले. तेव्हा देखील काही अभूतपूर्व आणि धक्कादायक तथ्ये समोर आली. त्यामुळेच पुढे सर्वोच्च न्यायालयाला तब्बल ५०० वर्षांपासून भारताच्या जनमानसाला भेडसावणारा एक अत्यंत गुंतागुंतीचा मोठा वाद सोडवणे शक्य झाले, अशी माहिती ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ पद्मश्री के. के. मुहम्मद यांनी मंगळवारी पुण्यात बोलताना दिली.

डेक्कन अभिमत विद्यापीठाचा १४ वा दीक्षान्त समारंभ मंगळवारी (दि.६) पार पडला. या वेळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे माजी संचालक पद्मश्री के. के. मुहम्मद, प्रा. कपील कपूर जेएनयु, विद्यापीठ दिल्ली आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संस्कृत विभागाच्या माजी विभाग प्रमुख प्रा. सरोजा भाटे या तीन नामावंत विद्वानांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मानद डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट) पदवी प्रदान करण्यात आली. पुणेरी पगडी, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला.

दीक्षान्त समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस. गुरुमूर्ती तर अध्यक्षस्थानी डेक्कन कॉलेजचे कुलपती प्रा. भूषण पटवर्धन, प्रभारी कुलगुरू प्रा. प्रसाद जोशी यांची उपस्थिती होती. या वेळी एकूण १६४ पदव्या प्रदान करण्यात आल्या.

काय म्हणाले, के. के. मुहम्मद...

  • माझा पुरातत्वशास्त्राचा प्रवास अयोध्येत प्रा. डॉ. बी. बी. लाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. १९७६-७७ च्या सुमारास मी त्यांच्या पथकाचा एक सदस्य म्हणून अयोध्येच्या उत्खननासाठी गेलो होतो.

  • या उत्खननातून त्या मशिदीच्या खालून काही अभूतपूर्व आणि अत्यंत धक्कादायक तथ्ये समोर आली. जी तोपर्यंत कोणालाही ठाऊक नव्हती. तिथून अनेक शिल्पे आणि पूर्वीच्या मंदिराशी संबंधित असलेले अनेक वास्तुकलेचे अवशेष उत्खननात सापडले.

  • नंतरच्या काळात या सर्व गोष्टींच्या विरोधात एका विशिष्ट गटाकडून एक मोहीम चालवली गेली होती. मला डॉ. लाल यांच्यासोबत त्या लोकांच्या प्रचंड विरोधाला, टीकेच्या भडीमाराला सामोरे जावे लागले. पण जर तुमचा हेतू प्रामाणिक असेल तर ईश्वर आणि निसर्गही तुम्हाला साथ देतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT