पुणे

सार्वजनिक कार्यक्रम टाळा; आरोग्य विभागाचे आवाहन : काय आहे कारण?

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उन्हाच्या वाढत्या झळा, निवडणुकांचा ज्वर, यामुळे सध्या वातावरण तापले आहे. येत्या काही दिवसांमध्ये प्रचार सभा, रॅली यांना जोर येणार आहे. उन्हाच्या तडाख्यातही सभांना गर्दी होणार आहे. अशा परिस्थितीत उष्माघाताचे प्रकार वाढू नयेत, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात मार्च महिन्यापासून तापमान वाढायला सुरुवात झाली. उन्हाच्या तडाख्यापासून काळजी घेण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. दुपारच्या वेळी सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणे टाळावे, सकाळी लवकर किंवा संध्याकाळी कार्यक्रम आयोजित करावेत, दुपारी कार्यक्रम आयोजित करायचे असल्यास उपस्थित राहणार्‍या लोकांसाठी मंडपाची आणि पुरेशा पाण्याची व्यवस्था करावी, असे नमूद करण्यात आले आहे. अतिश्रम करणारे, सातत्याने उन्हात प्रवास करणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले यांत उष्माघाताच्या त्रासाचे प्रमाण जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

वैद्यकीय अधिकार्‍यांसाठी सूचना

  •  वैद्यकीय सुविधांचे नियोजन करा; औषधांचा पुरेसा साठा तयार ठेवा.
  •  उष्माघाताची लक्षणे समजण्यासाठी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण द्या.
  • वृद्ध, लहान मुले, सहव्याधी व्यक्ती, रस्त्यावर, उन्हात काम करणारा कामगारवर्ग यांचे निरीक्षण करा.
  •  उष्णतेच्या लाटेत सुरक्षित कसे राहायचे, यासंबंधी लोकांना मार्गदर्शन करा, याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहचवा.
  •  आपत्कालीन सेवा आणि इतर विभागांशी समन्वय साधा.
  •  दिवसाचा सर्वांत उष्ण भाग टाळण्यासाठी शाळेच्या वेळा बदलण्यासाठी विभागांशी समन्वय साधा.
  • बेघर लोक आणि फेरीवाल्यांसाठी सार्वजनिक उद्याने खुली ठेवा.
  •  शीतकेंद्रे उभारा.
  •  स्थानिक अधिकार्‍यांनी जारी केलेला हवामान अंदाज आणि उष्णतेच्या सूचनांवर अपडेट राहा.

… अशी घ्या काळजी

  •  दिवसभर भरपूर पाणी प्या, कॅफिन किंवा अल्कोहोल असलेले पेय टाळा, रसदार फळे खा, प्रथिने घेणे टाळा.
  •  दुपारी 11 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. महत्त्वाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करा.
  • सैल कपडे घाला, उष्णता शोषून घेणारे गडद रंगाचे कपडे टाळा.
  • दुपारच्या वेळी शेतात काम करणे टाळा.
  •  चेहर्‍याचे आणि डोळ्यांचे सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी टोपी आणि सनग्लासेस घाला.
  •  अशक्तपणा, चक्कर येणे, मळमळणे जाणवल्यास वैद्यकीय मदत घ्या.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT