अवसरी बुद्रुकचा वीजपुरवठा वारंवार खंडित; चार वायरमनची नेमणूक करण्याची मागणी  File Photo
पुणे

अवसरी बुद्रुकचा वीजपुरवठा वारंवार खंडित; चार वायरमनची नेमणूक करण्याची मागणी

अवसरी बुद्रुक गावात एक हजार घरगुती वीज ग्राहक व कृषीपंपाचे आठशे ग्राहक आहेत

पुढारी वृत्तसेवा

मंचर: अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे रविवारी (दि. 18) रात्री निम्म्या गावचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. अवसरी बुद्रुक गावासाठी चार वायरमनची तातडीने नेमणूक करावी, अशी मागणी उपसरपंच अनिल हिंगे पाटील यांनी केली आहे.

अवसरी बुद्रुक गावात एक हजार घरगुती वीज ग्राहक व कृषीपंपाचे आठशे ग्राहक आहेत. येथे वायरमन वेळेत हजर नसतात. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते असा आरोप ग्रामस्थांनी केला. अवसरी येथील शेटेमळा, गुणगेमळा, वरचा हिंगेमळा, घुलेवस्ती, खालचा शिवार, चवरे -एलभरमळा, हिंगेवस्ती, चव्हाणमळा या वस्त्या गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस आहे. (Latest Pune News)

रात्रीच्या वेळी बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास घराबाहेर पडणे कठीण होते. त्यातच कृषी पंपांसाठी रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत वीजपुरवठा होतो. बिबट्यांच्या वास्तव्यामुळे पथदिवे, घराचा वीजपुरवठा रात्रीच्या वेळी सुरळीत चालू राहणे गरजेचे असते.

अवसरी गावासाठी गेली सहा महिन्यांपासून एकच वायरमन आहे. परंतु, वायरमन सतत आजारी असतात. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास अवसरीकरांना रात्र जागून काढावी लागते. त्यामुळे महावितरणने अवसरी गावासाठी चार वायरमनची स्वतंत्र नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य कल्याणराव हिंगे पाटील यांनी केली आहे.

अवसरी एसटी आगार डीपीची केबल जळाली आहे. महावितरण कंपनीकडे केबल शिल्लक नाही. त्यामुळे निम्म्या गावचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. ठेकेदाराकडे केबल उपलब्ध झाल्यास वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे. गावासाठी दोन वायरमन आहेत. त्यापैकी एक जण आजारी आहे. थोड्याच दिवसात आणखी दोन वायरमन उपलब्ध करून गावचा वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवण्याचा प्रयत्न आहे.
- विश्वनाथ शिंदे, कनिष्ठ अभियंता, महावितरण अवसरी खुर्द

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT