पुणे

Pune News : गुडघा बदलायचाय, आता चिंता नको! औंध जिल्हा रुग्णालयात मोफत प्रत्यारोपण

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गुडघ्यांमधील कमकुवत सांधे आणि गुडघा, स्नायूची झीज आणि तीव्र वेदना अशी परिस्थिती वयोमानानुसार किंवा अपघाताने उद्भवते. व्यायाम आणि औषधांनी फरक पडत नसल्यास डॉक्टर गुडघा प्रत्यारोपणाचा सल्ला देतात. प्रत्यारोपणाचा खर्च 3 ते 5 लाखांच्या घरात असतो. मात्र, औंध जिल्हा रुग्णालयात गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत होत असल्याने सामान्य रुग्णांना दिलासा मिळत आहे. मात्र, रुग्णांना याबाबत माहिती नसल्याने प्रत्यारोपणाचे प्रमाण अत्यल्प आहे.

गुडघा प्रत्यारोपणामध्ये वेदनादायक सांधा काढून कृत्रिम सांधा बसवला जातो. राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) गुडघा प्रत्यारोपणामध्ये वापरण्यात येणा-या कृत्रिम सांध्याच्या किमतीमध्ये 10 टक्क्यांनी वाढ करण्यास मान्यता दिल्याने प्रत्यारोपणाच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत प्रत्यारोपणाचा खर्च दिवसेंदिवस आवाक्याबाहेर जात आहे. जिल्हा रुग्णालयात महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत महागड्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत.

औंध जिल्हा रुग्णालयात गुडघा आणि मांडीचे सांधे प्रत्यारोपण उपचार 2015 पासून सुरू करण्यात आले. जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान 6 रुग्णांवर गुडघे प्रत्यारोपण, तर 13 रुग्णांवर नितंब सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या. सार्वजनिक आरोग्य विभागाने शासकीय रुग्णालयांमध्ये पूर्णपणे मोफत उपचार उपलब्ध करून दिल्याने जिल्हा रुग्णालयात एकही रुपया खर्च न करता तपासण्या, उपचार आणि शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहे.

गुडघा प्रत्यारोपणाचे फायदे ?

गुडघा प्रत्यारोपणामध्ये फिमर बोनचे टोक बाहेर काढले जाते आणि तेथे उच्च दर्जाच्या प्लास्टिक किंवा धातूच्या मिश्र धातुंद्वारे बदलले जातात. ही प्रक्रिया वेदना कमी करते आणि सामान्य गुडघ्याचे कार्य पूर्ववत होण्यास मदत करते. बदललेला गुडघा पूर्वीप्रमाणेच कार्य करतो. अत्याधुनिक वैद्यकीय प्रगतीमुळे शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित, प्रभावी आणि अचूकपणे पार पाडली जाते. रुग्णालयातील कालावधीदेखील कमी होतो. फिजिओथेरपिस्ट स्नायू बळकट करण्याच्या उद्देशाने काही व्यायाम प्रकार करण्याचा सल्ला देतात आणि रुग्ण पूर्वीप्रमाणे हालचाली करू शकतात.

खासगी रुग्णालयांमध्ये गुडघे प्रत्यारोपणाचा खर्च लाखांच्या घरांमध्ये असतो. अपघातामुळे किंवा वयोमानामुळे गुडघ्याची झीज झाल्यास आणि औषधोपचारांचा परिणाम होत नसल्यास प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी औंध जिल्हा रुग्णालयात मोफत शस्त्रक्रियांचा पर्याय उपलब्ध असल्याने रुग्णांना लाभ घेता येत आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक, औंध जिल्हा रुग्णालय.

जिल्हा रुग्णालयात झालेल्या शस्त्रक्रिया
वर्ष – गुडघा प्रत्यारोपण
2019-20 – 4
2020-21 – 0
2021-22 – 5
2022-23 – 5
2023-24 – 2

हेही वाचा

SCROLL FOR NEXT