औंध-बोपोडी प्रभागाची (क्र. 8) रचना जवळपास 2017 मधील प्रभागरचनेप्रमाणेच आहे. दाट लोकवस्तीच्या या प्रभागातील अनेक नागरिक अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पाणी, कचरा, ड्रेनेज, रस्ते, स्वच्छतेचा अभाव आदी समस्यांचा रहिवाशांना सामना करावा लागत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश असलेल्या औंध परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीसह विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. नदी सुधार प्रकल्पांतर्गत सुरू असलेली कामेही अद्याप अर्धवट अवस्थेत आहेत.
महापालिकेची 2017 मधील निवडणूक झाल्यानंतर सत्ताधारी भाजपने स्मार्ट सिटी प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पासाठी औंध भागाची सर्वप्रथम निवड करण्यात आली होती. या अंतर्गत परिहार चौक ते बेमेन चौक आणि परिहार चौक ते आंबेडकर चौक यादरम्यानचा रस्ता विकसित करण्यात आला होता. परंतु, भविष्यातील वाहतुकीचा विचार न करता हा प्रकल्प राबविला गेला आहे. पदपथ मोठे केले गेल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी अरुंद झाल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच, रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेअभावी वाहतूक कोंडीत आणखी भर पडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
विदेशी संकल्पनेनुसार या रस्त्यावरील पदपथ मोठे केल्याने नागरिकांना फिरण्याची आणि बसण्याची चांगली व्यवस्था झाली असली, तरी इतर समस्या मात्र वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बाणेर-औंध हद्दीवरील रस्त्याचे रुंदीकरण गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. भाले चौकातील वेस्टन मॉलसमोरील रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. या रस्त्यावर एकीकडे मॉल, तर दुसरीकडे स्थानिक व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, गेल्या काळात माजी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही नागरिक करीत आहेत. नदी सुधार प्रकल्पांतर्गत मुळा नदीत सुरू असलेले कामही अर्धवट अवस्थेत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये औंध परिसरात नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. परिसरातील पदपथांवर अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत असून, पार्किंग व्यवस्थेचाही अभाव आहे. परिसरातील रस्ते आणि पदपथांवर अनधिकृत स्टॉल थाटल्याचे चित्र दिसून येत आहे. एस. आर. ए. प्रकल्पाबाबतचा गोंधळही अद्याप दूर झालेला नाही. देखभाल दुरुस्तीअभावी गेल्या काही वर्षांपासून जलतरण तलाव पडून आहे. बंधनगड परिसरात कचऱ्याची समस्या आजही कायम आहे.
मी माझ्या कार्यकाळात औंध भागाचा कायापालट करून परिसर स्मार्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनानंतर महापालिकेत प्रशासकराज आले, तर जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मी कायम तत्पर आहे. प्रशासकांच्या काळात विविध विकासकामे ठप्प झाली आहेत. कोणाचेही नियंत्रण नसल्याने प्रशासनाचे नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.अर्चना मुसळे, माजी नगरसेविका
बोपोडी परिसर मोठा असून, या भागातील नागरिकांनाही विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये परिसरातील नागरिकांना विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले गेले. परंतु, अद्याप काही समस्या सुटलेल्या नसल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोना कालावधीतही अनेक विकासकामे मार्गी लावल्याचे माजी नगरसेवकांकडून सांगण्यात आले. औंध रोड येथील भाऊ पाटील पडळ, चंद्रमणी संघ, कांबळेवस्ती, बाराथेवस्ती, चिखलवाडी येथे सार्वजनिक स्वच्छतागृहांबाबत अनेक अडचणी आहेत. या भागात काही ड्रेनेजलाइन बदलण्यात आल्या असल्या, तरी काही वाहिन्या जुन्या असल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे या भागातही ड्रेनेजची समस्या जाणवत आहे.
गेल्या काळात प्रभागात विविध विकासकामे केली आहेत. नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. सध्या महापालिकेत प्रशासकराज असल्याने प्रभागातील विविध विकासकामे रखडली आहेत. प्रशासनावर सध्या कुणाचाही वचक नसल्याने साधा कचऱ्याचा प्रश्नही सोडविला जात नाही.सुनीता वाडेकर, माजी उपमहापौर
औंध रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतुकीची समस्या देखील दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असून, पथदिव्यांची देखभाल दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली आहे. कै. बाबूराव गेनबा शेवाळे दवाखान्यात रुग्णांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध नाही तसेच तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
हॉस्पिटलची नवीन इमारत बंद अवस्थेत
बोपोडी येथील जुन्या पुणे-मुंबई रस्ता परिसरातील संजय गांधी मॅटर्निटी हॉस्पिटलची नवीन इमारत गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहे. त्यामुळे बोपोडी, औंध रोड, चिखलवाडी परिसरातील गरोदर महिलांना प्रसूतीसाठी दूरच्या रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
प्रभागातील वस्ती भागामध्ये ’वॉटर, मीटर, गटर’ ही योजना राबवून नागरिकांच्या समस्या सोडविल्या आहेत. गेल्या आठ वर्षांपासून नागरिकांच्या सेवतेसाठी तत्पर असून, विविध कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, कोरोनानंतर प्रशासकराज आल्याने अनेक प्रकल्प मागे पडले आहेत.प्रकाश ढोरे, माजी नगरसेवक
प्रभागात झालेली विकासकामे
स्मार्ट सिटीअंतर्गत औंधमधील रस्त्यांचा विकास
संजय गांधी हॉस्पिटल
नवीन पाण्याची टाकी
घर तिथे स्वच्छालय योजना
ई-लर्निंग स्कूल सुरू
आठ बुद्धविहार आणि समाजमंदिरे
विपश्यना विहार, अभ्यासिका
स्व. गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक सभागृह
औंधमधील डी-मार्टशेजारील पुलाचे रुंदीकरण
चतुःशृंगी पाणीपुरवठा केंद्रात नवीन टाकी
पुण्यातील पहिले महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र
‘चिल्ड्रेन्स ट्राफिक पार्क’ची उभारणी
मुळा नदीकाठी एक किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक
प्रभागातील प्रमुख समस्या
एस. आर. ए. प्रकल्प रखडले
औंध येथे मुळा नदी सुशोभीकरण
औंध-बाणेर हद्दीवरील रस्त्याचे रुंदीकरण
वेस्टन मॉलसमोरील रस्त्याचे रुंदीकरण
संजय गांधी मॅटर्निटी हॉस्पिटलची नवीन
इमारत अद्यापही बंद
ड्रेनेजव्यवस्थेची ठिकठिकाणी झालेली दुरवस्था
हॉकी स्टेडियमचे काम अर्धवट
रेल्वे भुयारी मार्ग अरुंद
औंध येथील जलतरण तलाव
आठ वर्षांपासून बंद
बोपोडी मेट्रो स्टेशन परिसरात
पार्किंगव्यवस्थेचा अभाव