मंचर: अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) गावठाणात गुरुवारी (दि. 29) रात्री दोन ते तीनच्या दरम्यान चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला. घरातील लोक जागे झाल्याने चोरट्यांनी पळ काढला. मंचर पोलिसांनी याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.
अवसरी खुर्द मुख्य बाजारपेठेतील हरिभाऊ रखमा कराळे यांचे कुटुंब झोपले असताना पहाटे अडीचच्या सुमारास चोरट्यांनी बॅटरीच्या प्रकाशात कटावणीच्या साहाय्याने घराच्या चौकटीला छिद्र पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु, राहुल कराळे यांना जाग आली. बॅटरीचा प्रकाश दिसल्यावर त्यांनी कोण आहे? अशी विचारणा केली असता चोरटे पसार झाले.
चोरट्यांनी संतोष दत्तात्रय कसाब यांचा काचेचा खिडकीचा दरवाजा उघडून आतील कडी काढण्याचा प्रयत्न केला. संतोष यांच्या आई मालन कसाब यांना जाग आली असता चोरटा खिडकीतून हात घालून दरवाजाची कडी काढण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्यांनी संतोषला उठवल्यानंतर चोरट्यांनी पळ काढला.
बोत्रे आळी येथील शुभम विनोद बोत्रे हे गावी गेल्याने त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी लोखंडी दरवाजाची कडी तोडली. दरवाजाचे कुलूप काढत असताना कटावणाचा मोठा आवाज झाल्याने शुभम यांचे चुलते भरत बोत्रे दुसऱ्या मजल्यावरून ओरडल्याने चोरटे पसार झाले.
प्रसाद खोल्लम यांनी याबाबत मंचर पोलिसांना माहिती दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिस, स्थानिक तरुण सार्थक बोत्रे, यश बोत्रे, गणेश बोत्रे, सिद्धेश भुजबळ, परिमल खोल्लम यांनी चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा माग मिळाला नाही.