सावत्र पित्याकडून अल्पवयीन मुलीला विकण्याचा प्रयत्न; मुलीच्या धाडसामुळे धक्कादायक प्रकार उघडकीस File Photo
पुणे

Pune Crime: सावत्र पित्याकडून अल्पवयीन मुलीला विकण्याचा प्रयत्न; मुलीच्या धाडसामुळे धक्कादायक प्रकार उघडकीस

सहकारनगर पोलिसांनी 39 वर्षीय सावत्र पित्यावर गुन्हा दाखल केला आहे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पश्चिम बंगालमध्ये मावशीकडे राहणार्‍या अल्पवयीन मुलीला पुण्यात आणून कुंटणखान्यात विकण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सतरा वर्षे वयाच्या मुलीने दाखवलेल्या धाडसामुळे हे प्रकरण उघडकीस आले असून, याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी 39 वर्षीय सावत्र पित्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Latest Pune News)

यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, दोन वर्षे वयाची असतानाच वडिलांचे निधन झाल्याने ही धाडसी मुलगी आपल्या मावशीसमवेत पश्चिम बंगालमधील होशियाबादमध्ये राहात होती. तर, तिची आई गेल्या 15 वर्षांपासून आपल्या दुसर्‍या पतीसोबत पुण्यातील धनकवडी परिसरात वास्तव्यास होती.

फळविक्रीचा व्यवसाय करणारा तिचा सावत्र पिता पंधरा- वीस दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये तिच्या मावशीच्या घरी गेला. आपल्या नातेवाईकाचे लग्न असल्याचा बनाव करून त्याने या मुलीला जबरदस्तीने पुण्यात आणले व एका खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर फोनवरून त्याने मुलीला विकण्यासंबंधीची चर्चा सुरू केली.

खोलीत बंद असलेल्या या मुलीने ही चर्चा ऐकली व तिला जबरदस्त धक्का बसला. पश्चिम बंगालमध्ये राहिलेली असल्याने तिला फक्त बंगाली भाषाच येत होती. त्यामुळे काय करावे, हे तिला सुचेना. मात्र, मुंबईत राहणार्‍या दुसर्‍या मावशीसोबत संपर्क साधून तिने स्वतःवर बेतलेला हा प्रसंग सांगितला.

मात्र, हा कौटुंबिक प्रश्न असल्याचे कारण पुढे करून तिने मदत करण्याचे टाळले. तथापि, नंतर तिला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप झाला. म्हणून तिनेच मुंबईतील एका स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधून सावत्र पित्याच्या कचाट्यात अडकलेल्या आपल्या अल्पवयीन भाचीची सुटका करण्याची विनंती केली आणि या दुर्दैवी मुलीच्या सुटकेच्या प्रयत्नाला गती आली.

या स्वयंसेवी संस्थेतील कार्यकर्त्यांनी वेळ न दवडता त्यांच्या पुण्यातील शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पुण्यातील कार्यकर्त्यांनी घरात डांबून ठेवलेल्या या तरुणीचा मागोवा घेतला. धनकवडी परिसरात तिचा सुगावा लागताच त्यांनी गुन्हे शाखा आणि सहकारनगर पोलिसांची मदत मागितली.

पोलिसांनीही वेगाने हालचाल करून तिची सुटका केली व तिला सुधारगृहात पाठविले. दुसर्‍या दिवशी तिला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तिची वैद्यकीय तपासणी करून तिला सध्या रिमांड होममध्येच ठेवण्याचे आदेश दिले.

वैद्यकीय तपासणीनंतर व मुलीने दिलेल्या तक्रारी आधारे तिच्या सावत्र वडिलांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश बाल न्यायालयाने दिला. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी तिच्या सावत्र वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलीला पुन्हा पश्चिम बंगालमधील आपल्या मावशीकडे जायचे आहे. याप्रकरणी बाल न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला असून, तिच्या सावत्र वडिलांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गौड यांनी दिली. पोलिस निरीक्षक सुरेखा चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT