बारामती; पुढारी वृत्तसेवा : प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलावर तिघांनी कोयत्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी भिगवण (ता.बारामती) रस्त्यावरील महानगर बॅंकेजवळ घडली.
अल्पवयीन मुलगा शहरातील त्रिमूर्तीनगर भागात राहतो. शुक्रवारी तो एका सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेला होता. तो दुकानाबाहेर थांबला असता त्याचे मित्र असणाऱ्या तिघांनी हा हल्ला केला.
तिघांपैकी एकाच्या प्रेम प्रकरणामध्ये हा अल्पवयीन मुलगा आडवा येत असल्याच्या संशयातून हा हल्ला करण्यात आला. यात त्याच्या डोक्याला व पाठीला जबर जखम झाली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तिघा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दवाखान्यात जाऊन जखमीची चौकशी केली. तसेच घटनास्थळीही भेट दिली. संशयित आरोपीसुध्दा अल्पवयीन असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
हे वाचलंत का ?