ATS Search Operation In Kondhwa :
पुण्यातील कोंढवा परिसरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि पुणे पोलिसांनी मोठी संयुक्त कारवाई केली आहे. रात्रीपासूनच या भागात सर्च ऑपरेशन सुरू असून, पोलिसांनी परिसराला छावणीचे स्वरूप दिले आहे. ATS आणि पुणे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत कोंढव्यातील तब्बल २५ ठिकाणी छापे टाकले आहेत. विशेष म्हणजे ओपरेशन सुरू असताना या भागात तब्बल ८०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असल्यानं ही कारवाई करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा भागातील काही ठिकाणी अनधिकृतरित्या राहणारे लोक दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. याच संशयावरून एटीएस आणि पुणे पोलिसांनी कोंढवा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत.
या कारवाईदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच, तपास पथकांनी काही महत्त्वाची कागदपत्रे देखील जप्त केली आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, भागात I Love Muhammad चे बॅनर देखील झळकले आहेत. या भागात आता क्राईम ब्रांचचे अधिकारी देखील गस्त घालत आहेत.
ही कारवाई अतिशय संवेदनशील असल्याने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप तपास यंत्रणांनी दिलेली नाही. मात्र, या संयुक्त कारवाईमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या संयुक्त कारवाईत काही संशयितांना देखील ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्याकडून सिमकार्ड, कागदपत्रे, लॅपटॉप आणि अमली पदार्थ जप्त केल्याची देखील माहिती समोर येत आहे. पुण्यातील हा संवेदनशील भाग असल्यानं मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस या कारवाईबाबत अत्यंत गुप्तता पाळत आहेत.