महाराष्ट्रातील खेळाडूंना राज्य सरकारकडून प्रोत्साहन नाही; विनेश फोगाट यांची टीका  Pudhari
पुणे

महाराष्ट्रातील खेळाडूंना राज्य सरकारकडून प्रोत्साहन नाही; विनेश फोगाट यांची टीका

Vinesh Phogat News: ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देशाचा गौरव वाढविणार्‍या खेळाडूंना कसल्याही सोयी-सुविधा हे सरकार देत नाही.

पुढारी वृत्तसेवा

हरियाणापेक्षा महाराष्ट्रात जास्त चांगले खेळाडू आहेत. परंतु, त्यांना सरकारकडून प्रोत्साहन मिळत नाही. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देशाचा गौरव वाढविणार्‍या खेळाडूंना कसल्याही सोयी-सुविधा हे सरकार देत नाही. खेळाडूंसाठी चांगली मैदानेही नाहीत.

खेळाडूंच्या विकासासाठी खेळाच्या मैदानात आम्हा खेळाडूंना आशीर्वाद देता तसा महाराष्ट्राच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतांमधून आशीर्वाद द्या, असे आवाहन हरियाणातील काँग्रेसच्या आमदार आणि प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी सोमवारी केले.

काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार दीप्ती चौधरी, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा महंमद, अ‍ॅड. अभय छाजेड आदी उपस्थित होते.

फोगाट म्हणाल्या, “राजकारणात येईन, असे मला कधी वाटले नव्हते. मी आता राजकारणात असले तरी आधी खेळाडू आहे. आता राजकारणातील जबाबदारी वाढली आहे. मैदानावर संघर्ष केल्यानंतर महिलांच्या शोषणा विरोधात रस्त्यावर संघर्ष करावा लागला.

क्रीडा क्षेत्रात येऊ इच्छिणार्‍या तरुणींना हा त्रास होऊ नये, यासाठी मी संघर्ष करायला तयार आहे. खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा मिळाव्या तसेच चांगल्या वातावरणात त्यांना आपला खेळ वाढवता यावा यासाठी मी खेळाडूंबरोबर कायम मैदानात उभी असेन. चांगले शिक्षण आणि प्रशिक्षण दिले तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू देशात घडतील, अशी भावना फोगाट यांनी व्यक्त केली.

भाजपने महाविकास आघाडी सरकार पाडले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे दोन पक्ष फोडले. या महायुतीला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. मतदानात मोठी ताकद असते. ही ताकद महायुतीला दाखविण्याची वेळ आली आहे, अशी टीका त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT