कोल्हापूरचा सुपुत्र, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांचे कोल्हापूरशी अतूट नातं आहे. १९ जुलै १९३८ रोजी महाद्वार रोड परिसरात त्यांचा जन्म झाला. राजाराम महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. त्यांचे वडील रॅंगलर नारळीकर विद्यापीठ हायस्कूलचे संचालक होते, त्यांच्या आईच्या स्मरणार्थ शाळेत पारितोषिक दिलं जातं.
जयंत नारळीकर यांनी ‘चार नगरातले माझे विश्व’ या पुस्तकातून कोल्हापुरातील संस्कृती, घरातील वातावरण, आणि शाळेतील अनुभव नमूद केले. कोल्हापूरबरोबर त्यांनी वाराणसी केंब्रिज आणि मुंबई शहरांमधील आपले विश्व कसे आकाराला आले यावरही या पुस्तकात भाष्य केले आहे. डॉ. नारळीकर यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये गणितात प्रावीण्य मिळवले. बनारसच्या वातावरणात त्यांना भारतीय संस्कृती आणि विविधतेचा मोठा अनुभव आला. येथे त्यांनी गणित आणि विज्ञानामधील गाढा अभ्यास सुरू केला. यानंतर खगोलशास्त्राचे उच्च शिक्षणासाठी ते केंब्रिजला रवाना झाले. त्यांनी प्रसिद्ध शास्त्रज्ञ फ्रेड हॉयल यांच्यासोबत त्यांनी काम केले. हा काळ त्यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा होता, जिथे त्यांची शास्त्रीय ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झाली. इंग्लंडहून परतल्यानंतर त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), मुंबई येथे काम सुरू केले. त्यांनी भारतात खगोलशास्त्र आणि गणिताची उंची वाढवण्यासाठी मोठे योगदान दिले. याच काळात त्यांनी विज्ञानलेखन, विज्ञानकथा लेखनात अमूल्य असे योगदान दिले.
'चार नगरांतले माझे विश्व' या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी कोल्हापूरच्या आठवणी जपून ठेवल्या हाेत्या. सुट्टीत येणं, जुनं घर आणि शैक्षणिक आठवणी यांचा ते आवर्जून उल्लेख केला आहे. त्यांच्या कार्याबद्दल २००१ मध्ये राजर्षी शाहू पुरस्काराने त्यांचा गौरव झाला होता, तसेच 'करवीरभूषण', 'कोल्हापूरभूषण' यांसारखे सन्मानही मिळाले. ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला गेला होता.
डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापुरात झाला. महाद्वार रोड परिसर हे त्यांचं बालपणीचं ठिकाण होतं. त्यांच्या वडिलांचा शैक्षणिक आणि वैज्ञानिक वारसा त्यांच्यावर खोलवर परिणाम करून गेला. त्यांच्या आयुष्यातील पहिला शैक्षणिक टप्पा कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूल आणि राजाराम महाविद्यालयात पार पडला. इथूनच त्यांच्या वैज्ञानिक प्रवासाची पायाभरणी झाली.
डॉ. नारळीकरांचे वडील रॅंग्लर विष्णू नारळीकर हे एक थोर गणिततज्ज्ञ होते. बनारस हिंदू विद्यापीठात गणित विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांच्या आई सुमती नारळीकर या संस्कृत भाषा आणि परंपरेची जाण असलेल्या विदुषी होत्या. त्यामुळे घरातच एकीकडे शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन आणि दुसरीकडे साहित्यिक संस्कृती यांचा सुंदर संगम होता. ताे नारळीकरांच्या विज्ञान कथा लेखनातही प्रकर्षाने दिसून येतो.
डॉ. नारळीकरांनी प्राथमिक शिक्षण कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलमध्ये तर पुढील शिक्षण राजाराम महाविद्यालयात घेतले. याच काळात त्यांना गणित आणि विज्ञान यांच्याबद्दल विलक्षण रुची निर्माण झाली. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी कोल्हापुरातील हायस्कूलचे, महाद्वार रोडवरील घराचे आणि तिथल्या आठवणींचे वर्णन खूप भावनिक स्वरूपात केले आहे. “कोल्हापूरने माझ्यातला वैज्ञानिक घडवला” असं ते सहजतेने म्हणायचे.
डॉ. नारळीकरांच्या आत्मचरित्रात त्यांनी कोल्हापुरातील लहानपणीच्या आठवणी जपून ठेवलेल्या आहेत. सुट्टीत कोल्हापूरला जाणं, तेथील माणसांची ओळख, महाद्वार रोडवरचे त्यांचे वास्तव्य – हे सर्व त्यांनी अत्यंत आपुलकीने लिहिलं आहे. त्यांच्या घराचा एक भाग रस्ता रुंदीकरणात गमावावा लागला याचे दु:ख त्यांनी सहजपणे व्यक्त केलं आहे. हे सारे दाखवते की कोल्हापूर हे केवळ त्यांचे जन्मस्थान नव्हते, तर त्यांचे भावनिक आधारस्थान होते.
कोल्हापूर शहराने त्यांच्या कार्याचा नेहमीच सन्मान केला आहे. २००१ साली त्यांना राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय ‘करवीरभूषण’, ‘कोल्हापूर भूषण’ हे सन्मानही मिळाले. हे पुरस्कार स्वीकारताना त्यांनी भावनिक भाषणात कोल्हापूरच्या संस्कृती आणि जडणघडणीचा गौरव केला होता. ते म्हणाले होते, “जननी जन्मभूमी ही आईपेक्षा मोठी असते. त्यामुळे कोल्हापूरकडून मिळणारा सन्मान मला विशेष वाटतो.”
डॉ. नारळीकर यांचे वडील विद्यापीठ हायस्कूलचे संचालक होते. या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या आईच्या नावाने पारितोषिक सुरू करण्यात आले होते. डॉ. नारळीकर स्वत:ही शाळेला वेळोवेळी भेट द्यायचे. हे नातं केवळ औपचारिक नव्हतं, तर एक जिव्हाळ्याचं, प्रेमाचं आणि ऋण मानणारं नातं होतं.
२०२१ मध्ये नाशिक येथे झालेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नारळीकर यांची निवड झाली होती. ही निवड कोल्हापुरासाठी मानाचा तुरा ठरली. त्यांनी विज्ञान कथालेखनातून मराठी साहित्यात भरीव योगदान दिले होते.
‘टाइम मशीनची किमया’, ‘अंतराळातील स्फोट’, ‘वामन परत न आला’ या त्यांच्या विज्ञान कथा केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून नव्हे, तर मानवी भावभावनांच्या पातळीवरही वाचकांच्या मनात घर करून राहतात. त्यांच्या कथांमध्ये कोल्हापूरी शैली, मातीचा गंध आणि संस्कार झळकत असतात.
डॉ. जयंत नारळीकर यांनी फ्रेड हॉईल यांच्यासोबत खगोलशास्त्रात जागतिक संशोधन केलं, परंतु त्यांनी कोल्हापूरची ओळख कधीही विसरली नाही. ब्रिटन, अमेरिका किंवा मुंबई कुठेही गेले तरी ते स्वतःला कोल्हापूरचा, महाराष्ट्राचा मुलगा मानत राहिले.
डॉ. नारळीकर यांचं निधन म्हणजे कोल्हापूरसारख्या शैक्षणिक व वैज्ञानिक परंपरा असलेल्या शहराने एक तेजस्वी प्रकाशस्तंभ गमावल्यासारखं आहे. त्यांनी केवळ विज्ञानाच्या प्रगतीसाठी नव्हे, तर कोल्हापुराच्या शैक्षणिक आणि साहित्यिक पंरपरेसाठी भरीव योगदान दिलं हाेते.