पुणे : चतुर्थीच्या दिवशी चंद्रबिंब दिसते, अशी सहस्र म्हणजे सुमारे एक हजार चंद्रबिंब दुर्बिणीतून पुणेकरांना दाखवत त्याच्या विविध छटांचा अभ्यास विद्यार्थ्यांकडून करवून घेत शहरातील ज्योतिर्विज्ञान संस्था शुक्रवारी विनायकी चतुर्थीच्या दिवशी 81 वर्षांत पदार्पण करत आहे. संस्थेच्या या अनोख्या सहस्रचंद्र दर्शनाचा प्रवास संस्थेचे सारंग सहस्रबुद्धे यांनी सांगितला. तो त्यांच्याच शब्दांत...
‘सहस्रचंद्र दर्शन’ या समारंभाला आपल्या देशात एक खास सांस्कृतिक महत्त्व आहे. एक हजार पूर्णचंद्र पाहिलेल्या म्हणजे वयाची जवळजवळ 81 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीचा गौरव करणारा हा कार्यक्रम म्हणजे दीर्घायुष्य, अनुभव आणि सर्व जबाबदार्या उत्तम पार पाडल्याबद्दलचा एक मोठा सन्मानच. पुण्यातील ‘ज्योतिर्विद्या परिसंस्था’ म्हणजे आकाशवेड असलेल्या लोकांनी एकत्र येऊन आकाशवेधांसाठी सुरू केलेली संस्था. हौशी खगोलनिरीक्षकांची भारतातील सर्वांत पहिली संस्था. संस्थेच्या स्थापनेची कहाणी जशी रंजक, तशीच तिची गेल्या आठ दशकांची वाटचालही नेत्रदीपक आहे.
...अशी झाली सरुवात : सतराव्या शतकात दुर्बिणीचा शोध लागल्यापासून युरोपातून घेतल्या जाणार्या ग्रहगोलांच्या वेधांची अचूकता वाढली होती. विसावे शतक जवळ येताना भारतीय पंचांगकर्ते देखील जलमार्गे येणार्या या आधुनिक पुस्तिकांवर अवलंबून असत. 1944 साली जग दुसर्या महायुद्धाच्या ज्वाळांमध्ये होरपळून निघत होते. जलमार्गे येणारी ही माहिती मिळण्यास उशीर होऊ लागला, तेव्हा पुण्यातील काही खगोलप्रेमी आणि गणितज्ञ मंडळींनी एकत्र येत आपल्या दुर्बिणीची तजवीज करून खगोलवेध घेणे सुरू करता येईल काय, यावर विचारमंथन केले. त्यातून 22 ऑगस्ट 1944 रोजी गणेशचतुर्थीला ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना झाली.
2015 साली केसरीवाड्यालगतच्या इमारतीच्या गच्चीवर संस्थेची एक छोटेखानी घुमटाकार वेधशाळा उभारण्यात आली. येथून निरीक्षणकार्याबरोबरच लोकांसाठी खुले कार्यक्रम तसेच विज्ञानाच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे शोधप्रकल्प राबवले जातात. गेल्या काही दशकांत आधुनिकतेची कास धरत ज्योतिर्विद्या परिसंस्थेने वेधशाळा अद्ययावत आणि पूर्णतः स्वयंचलित केली.
संस्थापक सदस्यांमध्ये ज्येष्ठ संपादक ज. स. करंदीकर होते. तर सत्तरच्या दशकात शैक्षणिक समितीचे अध्यक्ष म्हणून प्रसिध्द खगोल शास्त्रज्ज्ञ दिवंगत डॉ. जयंत नारळीकर यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर यांनी काम पाहिलं. देणगी स्वरूपात मिळालेल्या काही छोट्या दुर्बिणी या भांडवलावर संस्थेचे कार्य सुरू झाले.
बर्याचदा दुर्गम ठिकाणी जाऊन प्रगत कॅमेरे आणि उच्च दर्जाची उपकरणे वापरून निरीक्षणे आणि ऑस्ट्रोफोटोग्राफी केली जाते. उल्कावर्षाव, शनीकडून किंवा चंद्राकडून तार्याचे पिधान, उल्कावर्षाव, मेसिये मॅरेथॉन, ग्रहणे, युती प्रतियुती, उपग्रह अशा अनेक घटनांचे खुले कार्यक्रम सुरू झाले.