कार्ला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सुदुंबरे (मावळ) येथील शेतकरी कुटुंबातील अश्विनी विशाल गाडे यांनी घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत एमपीएससी परीक्षेत यश संपादन केले असून, पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न साकार केले आहे. अश्विनीचे सातवीपर्यंतचे शिक्षण ताजे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर व्हीपीएस भाजे या शाळेमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तर, कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालयात शिक्षण घेत असताना बारावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे अश्विनीचे बारावीनंतर लग्न झाले. सुदैवाने सासरच्या लोकांनी तिची शिकण्याची जिद्द बघून तिला पुढील शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि तिने सुदुंबरे येथील सिद्धांत कॉलेजमध्ये येथे बीसीए ही पदवी पूर्ण केली.
सासू-सासरे, दीर, जाऊ आणि पती यांचा डोंगरासारखा आधार अश्विनीच्या प्रयत्नांना अधिकाधिक ऊर्जा व उत्साह देत होता. यातच त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला आणि जिद्दीने यश संपादन केले. मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना त्यांना 20 दिवसांच्या मुलाला घरी सोडून अभ्यासाला जावे लागत होते. मावळ तालुक्यात आर्थिक सुबत्ता जरी बर्यापैकी असली तरी मुलींच्या शिक्षणाकडे अनेकांचे दुर्लक्ष होताना दिसते. अशातच अश्विनीने घेतलेल्या शिक्षणाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
हेही वाचा