अशोक वेदपाठक, मोरगाव
प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा !अज्ञानत्व हरवुनी बुद्धी मति ते आराध्य मोरेश्वरा !!
चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी !हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी !!
या संस्कृत ओळींची आठवण होते ते मोरगावच्या श्री मयूरेश्वरदर्शनाने. बारामती-पुणे या प्रमुख राज्यमार्गावर अष्टविनायकांचे आद्य तीर्थक्षेत्र मोरगावचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हजारो वर्षांपूर्वीच हे स्वयंभू पृथ्वीवरील पहिले गणेश मंदिर मानले जाते. धार्मिक क्षेत्रांमध्ये या स्थानाचे विशेष महत्त्व आहे.
अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि शेवट याच श्रींच्या दर्शनाने करण्याची प्रथा रूढ आहे. सध्या अष्टविनायक तसेच पर्यटनानिमित्त मोरगाव येथे राज्यासह देशभरातून आणि परदेशातून हजारोंच्या संख्येने गणेशभक्त नित्य दर्शनासाठी मोरगावला येतात. कऱ्हा नदीकाठावर उत्तराभिमुख असलेले हे मंदिर दगडी शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. मोरेश्वराच्या बेंबीत हिरा, डोळ्यांत माणिक आणि डोक्यावर नागफणी, अशी ही श्रींची विलोभनीय मूर्ती आहे. दरम्यान, भाद्रपद आणि माघ महिन्यातील शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या काळात श्री मयूरेश्वराची यात्रा भरते. मोरगाव येथे पारंपरिक राजेशाही थाटातील दसरा विजयादशमी सण हे गावचे खास आणि विशेष वैशिष्ट्य आहे. गावातूनच बारामती-पुणे हा प्रमुख राज्यमार्ग असल्याने नेहमीच्या तुलनेत दर शनिवारी, रविवारी आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी पर्यटक भाविकांची मोठी गर्दी होत असते.
महान गणपती संप्रदाय गणेशभक्त श्रीमान मोरया गोसावी यांचे मोरगाव हे जन्मस्थान (पवळी) आहे. मोरगावातील कऱ्हा नदी येथील गणेशकुंड हे पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ धार्मिक पवित्र स्थान म्हणून मानले जाते. मोरगावच्या गणेशकुंडाजवळच महान गणेशभक्त श्री गणेश योगेंद्रचार्य यांची समाधी आहे. जमिनीपासून ५० फूट उंच तटबंदी असलेले हे मंदिर चौरस आकाराचे आहे.
सर्वसाधारण भारतात शंकर उपासक व शिव मंदिरासमोर नंदीच्या मूर्ती असल्याचे सर्वत्र पाहायला मिळते. परंतु, मोरगाव हे गणपती संप्रदायातील एक वेगळे स्थान आहे. या मंदिरासमोर असलेली भव्य नंदीची मूर्ती हे या तीर्थस्थानाचे मुख्य आकर्षण आहे. येथून जवळच पुरंदर तालुक्यातील असलेल्या भुलेश्वर मंदिरात स्थापन करण्यासाठी हा नंदी ऐतिहासिक काळात घेऊन जात असताना तो गाडा या मंदिरासमोरच मोडला व यानंतर मूर्ती कारागिराच्या स्वप्नात जाऊन नंदीने याच ठिकाणी स्थापन करण्याची विनंती केल्यावरून ही मूर्ती या ठिकाणी असल्याचे सांगितले जाते.
श्री गणेशाचे वाहन म्हणून मूषक हे सर्वश्रुत आहे. येथील मंदिरासमोर ११ पायऱ्या उतरल्यानंतर भव्य मूषकाची पाषाण मूर्ती पाहायला मिळते. दक्षिणाभिमुख ही भव्य कोरीव मूर्ती आहे. याच ठिकाणी पारंपरिक वाद्य नगारखाना विराजमान आहे. मंदिरातील धार्मिक कार्यक्रम व विशिष्ट सणवाराला दैनंदिन ठरावीक वेळेला येथील हे मंगल वाद्य वाजविण्याची प्रथा आणि परंपरा अखंड सुरू आहे.
मोरगावला दसरा सणाची राजेशाही परंपरा आहे. शेकडो वर्षापासून मानाच्या पाच तोफा आजही श्रींच्या शाही मिरवणुकीत सहभागी होतात. विशिष्ट ठिकाणी या तोफांची मानाची सलामी दिली जाते. सनई-चौघड्याचे मंगलमय सूर, शोभेच्या दारूची आतषबाजी, पारंपरिक प्रथा आणि परंपरा तब्बल १८ तास चालणारी मिरवणूक, हे मोरगावचे खास आकर्षण आणि वैशिष्ट्य मानले जाते. गावातील प्रत्येक घरात हा सण जिव्हाळ्याचा ठरतो.
दररोज राज्यभरातून हजारो भाविक मोरगाव येथे दर्शनानिमित्त येत असतात. गावात आल्यानंतर त्यांना निवासी राहण्याच्या दृष्टीने प्रशस्त व्यवस्था अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्ट तसेच अष्टविनायक सेवा ट्रस्ट व अन्य खासगी ठिकाणी भक्तांना निवासी राहण्यासाठी भव्य भक्तनिवास उपलब्ध आहेत. यामुळे दर्शनास आल्यानंतर निवासाची गैरसोय होत नाही.
अष्टविनायक व अन्य यात्रेनिमित्त या ठिकाणी प्रवासासाठी येत असताना पुण्याहून बारामतीकडे जाणारा मुख्य मार्ग आहे. तसेच सातारा, सांगली व कोल्हापूर या ठिकाणांहून येण्यासाठी निरामार्गे मोरगावला येता येते. बारामतीहून मोरगाव व शिरूर, सातारा, दौंड या ठिकाणांहून मोरगावला येण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. राज्य परिवहन विभागाच्या एसटी बस तसेच खासगी प्रवासी वाहतुकीचा मार्ग या ठिकाणी आहेत.