पुणे: डोक्यावर तुळशी वृंदावन अन् हातात भगवी पताका व टाळ-मृदंग घेतलेला वैष्णवांचा मेळा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात दाखल होताच व्यापारी, अडते यांनी वैष्णवांचे पुष्पहार घालून उत्साहात स्वागत केले. वैष्णवांच्या दोन दिवसांच्या मुक्कामाच्या पार्श्वभूमीवर यंदाही व्यापाऱ्यांकडून न्याहारी, महाप्रसाद, भारूड, कीर्तन तसेच भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या वेळी व्यापारीवर्गाकडून वारकर्यांना दैनंदिन गरजेच्या साहित्याचे वाटपही करण्यात आले.
गुलटेकडी मार्केट यार्डात दरवर्षी अंदाजे १५० ते २०० दिंड्या मुक्काम करत असतात. त्या अनुषंगाने वैष्णवांच्या स्वागतासाठी बाजार आवारातील तरकारी, फळे, फुले, गुळ-भुसार विभागासह केळी बाजारातील अडतदार, व्यापारी, कामगार तसेच बाजार समितीच्या पदाधिकार्यांसह प्रत्येकातच वारकर्यांची सेवा करण्यासाठी चढाओढ लागली होती.
गुलटेकडी मार्केटयार्डातील गुळ-भुसार विभागातील ३९ व्यापार्यांच्या दुकानात वारकर्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी, दि पूना मर्चंटस चेंबरच्या सभासदांमार्फत १५ हजार वारकर्यांची सेवा करण्यात आली. गुरुवारी दुपारपासूनच वारकर्यांसाठी चहापान, अल्पोपहार, भोजनाची व्यवस्था केली होती.
याखेरीज बाजारात मोबाईल टॉयलेटही ठेवले होते. दुकानमालकांसह, दिवाणजी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने वारकर्यांच्या सेवेत गुंतले होते. वारी दरम्यान लागणार्या रेनकोट, खाद्यान्न वस्तू, पाण्याच्या बाटल्या, कपडे यांसह दिंड्याना आर्थिक मदत व्यापारी वर्गाकडून करण्यात आली.
या अडते, कामगारांकडून वारकऱ्यांचरणी सेवा रुजू
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश घुले, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ कुंजीर व पदाधिकारी, श्री शारदा गजानन अडते असोसिएशनचे अध्यक्ष अमोल घुले व पदाधिकारी, तरकारी विभागातील अडतदार महेश शिर्के, राजेंद्र सूर्यवंशी फळविभाग - युवराज काची, रोहन जाधव, राकेश काची कांदा बटाटा विभाग - राजेंद्र कोरपे, भुसार विभाग - दि पूना मर्चंटस चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बांठिया, नगरसेवक प्रवीण चोरबेले, माजी अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, राजेंद्र गुगळे, सोपान राख तसेच कामगारांची संघटना असलेल्या तोलणार संघटनेचे किशोर भानुसघरे यांच्यामार्फत वारकर्यांची सेवा करण्यात आली.