आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांची दिंडी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाली आहे पुढारी
पुणे

Ashadhi Wari | बापाने जीव दिला, तुम्ही चूक करू नका

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पाऊस नाही...पाणी नाही...अन् पिकेही नाही. घेतलेले कर्ज कसे फेडणार? कर्ज फेडता-फेडता जातोय आमच्या बापाचा जीव, तो वाचवण्यासाठी आम्हाला मदत करा, अशी आर्त हाक आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांनी रविवारी दिली.

जीवन संपवलेल्या शेतकर्‍यांची मुले दिंडीत सहभागी

संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्रीतुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुला-मुलींच्या दिंडीचेही रविवारी पुण्यात आगमन झाले. नाशिक येथील आधारतीर्थ आश्रमात जीवन संपवलेल्या शेतकर्‍यांच्या मुला-मुलींचे पालनपोषण केले जात आहे. त्यांच्यामार्फत ही दिंडी काढण्यात आली.

27 जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची 50 मुले या दिंडीमध्ये सहभागी झाली आहेत. त्यातील काही मुले तर अवघ्या 3 ते 4 वर्षांची आहेत. ‘आमच्या वडिलांनी कर्जामुळे जीव गमावला, आपण असे करू नका’, अशा संदेशांचे फलक हाती घेऊन हे चिमुकले वारीला निघाले आहेत. या दिंडीने पुणेकरांचे लक्ष वेधून घेत, पुणेकरांसह प्रशासनालादेखील हळहळ व्यक्त करण्यास या वेळी भाग पाडले.

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांसाठी आम्ही ट्रस्ट उभारली आहे. त्यांचे पालनपोषण आम्ही या ट्रस्ट मार्फत करत आहोत. आम्ही अनेकांकडून मदत प्रसंगी भीक मागून हा आश्रम चालवत आहोत. शासनाने आम्हाला मदत करायला हवी. मात्र, शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. अशी वेळ चुकूनही कोणावर येऊ नये, अशी प्रार्थना पांडुरंगाचरणी करण्यासाठी आम्ही या वारीत सहभागी झालो आहे.
रेवजी बाळाजी वाळुंज, आधारतीर्थ आश्रम, नाशिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT