Ashadhi Wari 2026 Sant Tukaram Maharaj Palkhi  File Photo
पुणे

Ashadhi Wari 2026: देहूनगरीत संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात, दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा

वारकऱ्यांना ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी वारीला आजपासून टाळ आणि मृदंगाच्या गजरात सुरुवात होणार आहे.

मोहन कारंडे

Ashadhi Wari 2026 Sant Tukaram Maharaj Palkhi

देहू : सागर शिंदे

वारकऱ्यांना ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी वारीला आजपासून टाळ आणि मृदंगाच्या गजरात सुरुवात होणार आहे. देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि देहू देवस्थानने भाविकांना शक्य असल्यास जिथे असतील तिथून किंवा थेट पुण्यात पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मात्र, या आवाहनानंतरही संत तुकाराम महाराज, विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.

मुख्य मंदिरातील गाभाऱ्याला देशी-विदेशी आणि विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून, या मनमोहक फुलसजावटीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

इंद्रायणी नदी धोक्याच्या पातळीवर; भाविकांना नदीकाठावर जाण्यास मनाई

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त देहूनगरीत भक्तिमय वातावरण असून, हजारो वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. मात्र, मावळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन आणि देहू देवस्थानच्या वतीने इंद्रायणी नदीकडे जाणारे मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. नदीकाठी कोणालाही जाण्याची परवानगी दिली जात नसून, प्रशासनाकडून सातत्याने दक्षता घेतली जात आहे. पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पालखी सोहळ्यात अनावश्यक गर्दी टाळा, सुरक्षित राहा

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या पालखी सोहळ्याला आज देहूनगरीत भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थान आणि प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

दरवर्षी पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आणि भाविक देहूत दाखल होत असतात. यंदा मात्र मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता देहू संस्थानने भाविकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचे, सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच शक्य असल्यास पुण्यातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असेही संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT