रामदास डोंबे
खोर: श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १२ जुलै रोजी दौंड तालुक्यात आगमन होत असून, यवत येथे पहिला तर १३ जुलै रोजी वरवंड येथे दुसरा मुक्काम होणार आहे. लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी प्रशासन आणि ग्रामस्थांनी व्यापक नियोजन केले असून, दोन्ही ठिकाणी राहण्यापासून स्वच्छता, स्नान, पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सुविधांची भक्कम व्यवस्था करण्यात आली आहे.
वारकऱ्यांच्या निवासासाठी दौंड तालुक्यात एकूण चार भव्य जर्मन तंबू उभारण्यात आले आहेत. त्यापैकी यवत येथे दोन आणि वरवंड येथे दोन तंबू उभारण्यात आले असून, वारकऱ्यांना सुरक्षित व आरामदायी निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यवत येथे सुमारे ४० हजार चौरस फूट क्षेत्रफळ मध्ये दोन जर्मन तंबू उभारण्यात आले आहेत. तसेच १२०० शौचालयांची, ५०० स्नान सुविधांची आणि ३०० मोबाईल चार्जिंग पॉइंटची व्यवस्था करण्यात आली आहे.
वरवंड येथे एकूण ३८ हजार ५०० चौरस फूट क्षेत्रात दोन जर्मन तंबू उभारण्यात आले आहेत. येथे १,२०० शौचालये, १५० स्नानगृहे, १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा तसेच १२ जेटिंग पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पालखी सोहळ्याच्या तयारीची पाहणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, दौंडचे आमदार राहुल कुल, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, दौंड पंचायत समितीचे सभापती सुखदेव चोरमले, तसेच पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून विविध विभागांना आवश्यक सूचना दिल्या.
याशिवाय, बोरीभडक ते पाटस दरम्यानच्या पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी नाश्ता केंद्रे, सावलीसाठी मंडप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी प्रशासन, यवत व वरवंड ग्रामपंचायती, विविध विभाग आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था समन्वयाने काम करत असून, दौंड तालुका वारकरी सेवेच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे.