Ashadhi Wari 2025 Pune Sambhaji Bhide Latest News
पुणे : पुणे शहरातील बाकिमचंद्र चट्टोपाध्याय रस्त्यावर संचेती रुग्णालयाजवळ संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात काही काळ गोंधळ निर्माण झाला. भिडे गुरुजी आणि कार्यकर्त्यांनी पालखी रथाचे सारथ्य केले. वारकऱ्यांनी यावर आक्षेप घेतला. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर भिडे गुरुजी आणि अन्य धारकरी खाली उतरले.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (भिडे गुरुजी) यांच्या नेतृत्वाखालील धारकऱ्यांनी पालखी रथाजवळ गर्दी केली. वारकऱ्यांनी यावर आक्षेप घेतल्याने पोलिसांनी धारकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
या घटनेमुळे पालखी सोहळ्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता. वारकरी आणि धारकरी एकमेकांना भिडल्याचे चित्र दिसले. या घटनेमुळे पालखी सोहळ्याच्या परंपरेला बाधा आल्याचे वारकऱ्यांचे म्हणणे होते. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, संत तुकाराम महाराज पालखीचे (गुरुवार, दि. २० जून) पाटील इस्टेट चौकात पाचच्या सुमारास आगमन होताच भाविकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. पालखीचे स्वागत करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पाटील इस्टेट चौकात पालखी दाखल होताच भाविकांनी फुलांची उधळण करून पालखीचे आणि वारकऱ्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी पुलावरूनही पालखी पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती, ज्यामुळे परिसरात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
तर संचेती हॉस्पिटल चौकात संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.