Pune Vitthal Mandir Pudhari
पुणे

Pune Ashadhi Ekadashi: ‘विठ्ठल... विठ्ठल...’च्या अखंड गजरात पुणे भक्तिरंगात; आषाढी एकादशी उत्साहात साजरी

फुलांची सजावट, काकड आरती, हरिपाठ-कीर्तन आणि महाप्रसादाने मंदिरे फुलली; पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: रंगबीरंगी फुलांची-पताक्यांची आकर्षक सजावट, विद्युतरोषणाईने उजळलेली मंदिरे, पहाटेच्या काकड आरतीचे मंगल स्वर आणि सर्वत्र दुमदुमणारा 'विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल...'चा जयघोष, अशा भक्तिमय वातावरणात शनिवारी (दि. २५) शहर आणि उपनगरांमध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी झाली. महापूजा, अभिषेक, आरती, भजन, कीर्तन, हरिपाठ, प्रवचने आणि महाप्रसाद अशा दिवसभर झालेल्या धार्मिक कार्यक्रमांनी सगळे वातावरण श्री विठ्ठलमय झाले. घराघरांमध्येही आषाढी एकादशीचा भक्तीचा रंग पाहायला मिळाला.

जशी अवघी पंढरी आषाढीला विठ्ठलमय झालेली पाहायला मिळाली, त्याचेच प्रतिबिंब पुण्यातही पाहायला मिळाले. भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिर, नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिर, नवी पेठेतील श्री विठ्ठल मंदिर, टिळक चौकातील श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर, अशा विविध श्री विठ्ठल मंदिरांमध्ये दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होती. अनेक भाविकांनी पारंपरिक वेशभूषेत दर्शन घेत विठुमाउलीचरणी नतमस्तक होत कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली. पहाटे महापूजा, अभिषेक आणि काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली.

त्यानंतर हरिपाठ, भजन, अभंगगायन, प्रवचने आणि हरिकीर्तनांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला. मंदिरांमधील फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईमुळे उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. टाळ-मृदंगांचा गजर, विठुमाउलीच्या नामाचा जयघोष आणि प्रत्येकाने केलेले विठुनामाचे स्मरण, असे वातावरण मंदिरांमध्ये पाहायला मिळाले. भाविकांनी महाप्रसादाचा लाभही घेतला. भाविकांचा उपवास असल्याने साबूदाणा खिचडी, राजगिरा लाडू, साबूदाणा वडा आदी उपवासाच्या पदार्थांचे वाटप केले. मंदिरांमध्ये सकाळपासून झालेली भाविकांची गर्दी सायंकाळपर्यंत कायम होती.

भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. पहाटे अभिषेक, पूजा आणि काकड आरतीनंतर भजन झाले. हरी भजन, श्री विष्णू सहस्रनाम (तुळशी अर्चना), श्री हरिपाठ तर सायंकाळी ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील यांचे हरिकीर्तन झाले. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिरातही आषाढी एकादशीला भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. विविध धार्मिक उपक्रम झाले. नवी पेठेतील श्री विठ्ठल मंदिर आणि टिळक चौकातील श्री लकडी पूल विठ्ठल मंदिरातही भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.

आषाढी एकादशीनिमित्त सोशल मीडियावरही भक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्सवर वारकरी, कलाकार आणि भाविकांनी अभंग, कीर्तन, भजनांचे व्हिडीओ, मंदिरांची सजावट, दिंड्यांची छायाचित्रे आणि संदेश मोठ्या प्रमाणावर शेअर केले. श्री विठ्ठलनामाच्या अखंड गजराने पुण्यातील वातावरण दिवसभर भक्तिरंगात न्हाऊन गेले. श्रद्धा, संस्कृती आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम अनुभवत पुणेकरांनी आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली.

घराघरांतही भक्तीचा उत्साह

आषाढी एकादशीनिमित्त घराघरांतही चैतन्यपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. अनेकांनी दिवसभर उपवास करून श्रीविठ्ठल-रखुमाई यांची पूजा, अभिषेक आणि आरती केली. कुटुंबीयांनी एकत्र येऊन हरिपाठ, अभंग, भजन आणि विठ्ठलनामाचा जप केला. उपवासासाठी साबूदाणा खिचडी, राजगिरा, शेंगदाणा, बटाटा आणि इतर पारंपरिक पदार्थांची रेलचेल होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT