पुणे: विद्युतरोषणाईने उजळलेली मंदिरे, फुलांची अन् रंगबिरंगी पताक्यांची सजावट, उत्सव मंडपाची उभारणी अन् भजन-कीर्तनासह भक्तिगीतांच्या कार्यक्रमांची रेलचेल... असे उत्साही आणि आनंदी वातावरण पुण्यातील श्री विठ्ठल मंदिरांमध्ये पाहायला मिळत असून, रविवारी (दि. 6) साजर्या होणार्या आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल मंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे.
पहाटे महापूजा, अभिषेक, काकड आरती होणार आहे; तर दिवसभर धार्मिक कार्यक्रम रंगणार असून, आषाढी एकादशी निमित्त महाप्रसादाचाही लाभ भाविकांना घेता येणार आहे. श्री विठुनामाच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमणार असून, मंदिरे दर्शनासाठी दिवसभर खुली राहणार आहेत. श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेत भाविक सर्वांच्या सुखसमृद्धीची कामना करणार आहेत. घराघरांमध्येही ज्ञानोबा-माउली-तुकारामचा जयघोष घुमणार आहे. (Latest Pune News)
जशी अवघी पंढरी आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन जाणार आहे, त्याचेच प्रतिबिंब पुण्यातही पाहायला मिळणार आहे. शहर आणि उपनरातील श्री विठ्ठल मंदिरांमध्येही भक्तीचा सोहळा आनंदाने रंगणार आहे. भवानी पेठेतील श्री पालखी विठ्ठल मंदिर, नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिर, नवी पेठेतील श्री विठ्ठल मंदिर, टिळक चौकातील श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर, श्री विठ्ठल रखुमाई मंदिरासह (विठ्ठलवाडी, हिंगणे खुर्द) शहरातील विविध मंदिरांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रम रंगणार आहेत.
भाविकांचा उपवास असल्याने साबूदाणा खिचडी, राजगिरा लाडू, साबूदाणा वडा या प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. भवानी पेठेतील श्री पालखी विठ्ठल मंदिराचे विश्वस्त गोरखनाथ भिकुले म्हणाले, पहाटे अभिषेक, महापूजा आणि काकड आरती होईल. सकाळी साडेनऊ वाजल्यानंतर दिवसभर खिचडी वाटप करण्यात येणार आहे.
दुपारी दोन ते सायंकाळी चार वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम, चार ते पाच वाजेपर्यंत हरिपाठ, रात्री आठ ते दहा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला असून, दर्शनासाठी मंदिर दिवसभर खुले राहणार आहे. नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिराचे व्यवस्थापक आनंद पाध्ये म्हणाले, आषाढी एकादशीमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले आहेत. पहाटे महापूजा, अभिषेक आणि काकड आरती होईल.
भाविकांना महाप्रसादाचाही लाभ घेता येईल. दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महिला भजन मंडळाचा कार्यक्रम तर सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत दया कुलकर्णी यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होईल. रात्री साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम रंगणार आहे. विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावटही केली आहे.
भजन-कीर्तनासह भक्तिगीतांचे आयोजन
श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट पुणेच्या आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले आहेत. महापूजा, महाआरती झाल्यानंतर भाविकांना खिचडी वाटप करण्यात येणार आहे. यानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजनही केले आहे. मंदिराच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज सभागृहामध्ये आरोग्य शिबिरही होणार असून, विठ्ठल मंदिरातील सभामंडपात सायंकाळी सहा वाजता भक्तिसंगीताचा कार्यक्रम अनुजा पंडित सादर करतील.