सुलभा तेरणीकर
ज्येष्ठ चित्रपट आणि संगीत अभ्यासक
आशाताईंच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त एका वृत्तपत्रासाठी त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. हा क्षण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता. इतकी वर्षे ज्यांना भेटण्याची इच्छा होती ती पूर्ण झाली. मुलाखतीसाठी मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांनी अगदी मी त्यांची मैत्रीणच आहे, अशा पद्धतीने माझ्याशी संवाद साधला. एकदम मनमोकळा संवाद. जणू ही मुलाखत नाही, तर दोन मैत्रिणीच एकमेकींशी बोलत असाव्यात. त्यांच्या आयुष्यातील विविध कंगोरे त्यांनी मुलाखतीत उलगडले. आज माझ्या अशा जवळच्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. आशाताईंच्या आठवणी सदैव मनात राहतील.
मुलाखतीच्या सलामीच्या वाक्यांची जुळवाजुळव करीत असतानाच त्या आल्या. प्रसन्न, प्रियदर्शन, दिलखुलास. ‘उठी श्रीरामा’च्या भूपाळीतून प्रसन्न वदने सुवासिनी कुणी... साक्षात गाण्यातून आल्यासारखी. मंगेशकर घराण्याच्या खुणा चेहरेपट्टीतून टिपून घेत असताना तिच्या गाण्यांतून तिला शोधत असतानाच, ‘चला माझ्याबरोबर दोन घास खाऊ’ची प्रेमळ आग््राही आज्ञा. माझी परजून ठेवलेली सारी आयुधे निकामी आणि तिच्या पंक्तीचा अपूर्व क्षण कसा स्वीकारावा, या विचारात सैरभैर. हरिद्वारच्या पूरभैयांनी शिकवलेली खास बटाट्याची रस्सा भाजी विस्तृत पाककृतीच्या नमुन्यासह ऐकत राहते. मसाल्याची यादी, फोडणी करण्याची विशिष्ट पद्धत. स्वयंपाकघरात मुरलेल्या जातिवंत अन्नपूर्णेच्या समोर आहे की, ‘दम मारो दम’वाल्या गायिकेसमोर ते उमजतच नव्हते. डाव्या हाताने भरपूर तूप घालणाऱ्या गृहिणीधर्मापुढे मी शरण जाते आणि ‘नाच रे मोरा’च्या वेळी ओळख झालेल्या आशा भोसले नावाच्या मैत्रिणीशी गप्पांची मैफल रंगते अन् मुलाखत रंगणे म्हणजे काय असते, याचा अनुभव येतो. ही आठवण 1993 सालची आशाताईंची मी घेतलेल्या मुलाखतीची.
लतादीदींशी आधी जुळलेले ऋणानुबंध होतेच. लतादीदी मला 1986-87 साली भेटल्या. त्या वेळेला एक लेखिका म्हणून लतादीदींनी मला त्यांच्या आठवणी सांगितल्या. पण, आशाताईंशीही संवाद साधावा, त्यांचीही मुलाखत घ्यावी, ही इच्छा मनात होतीच. पण, निमित्त जुळून येत नव्हते. मंगेशकर कुटुंबातील महत्त्वाचा धागा असलेल्या आशाताईंशीही गप्पाष्टक रंगावे, हे मनात होते. आशाताईंना बघण्याची संधी आली ती, मीनाताईंची मुलगी रचना हिच्या लग्नात. बदामी रंगाचा शालू, अंबाडा, असे त्यांचे रूप खुलून दिसत होते. लग्नात अक्षरश: त्यांची इथे तिथे उत्साहाने लगबग सुरू होती. नंतर त्यांना पुन्हा भेटण्याचा योग आला नाही. परंतु, म्हणतात ना, मनात इच्छा असेल तर सर्व गोष्टी पूर्ण होतात. माझ्याबाबतीत तसेच झाले.
आशाताईंच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त एका वृत्तपत्रासाठी त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. वयाच्या 14 व्या वर्षी घेतलेला लग्नाचा निर्णय असो वा त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार, अशा प्रत्येक गोष्टीवर त्या मनमोकळेपणाने आणि भरभरून बोलल्या. एवढ्या मोठ्या गायिकेने आपल्या आयुष्यातील विविध पैलू माझ्यासमोर उलगडल्यामुळे मी भारावून गेले. नामवंत गायिका, एक गृहिणी, मैत्रीण, आई अशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर त्या बोलत्या झाल्या.
मनमोकळेपणाने बोलणे हा त्यांचा स्वभाव, त्यांचे व्यक्तिमत्त्व साधे होते. आशाताईंचा त्यांच्या भावा-बहिणींसोबत असलेला बंध, गायिका म्हणून चित्रपटसृष्टीत झालेला प्रवास, त्यांचे व्यक्तिमत्त्व, आई आणि गृहिणी म्हणून असलेली त्यांची भूमिका, असे सारे काही त्यांनी बोलके केले. ही मुलाखत अतिशय दिलखुलास पद्धतीने रंगली. तीन मुलांचे संगोपन, आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याची ताकद अशा आयुष्याच्या संघर्षाविषयी त्या भरभरून बोलल्या. कोणी मला आयुष्याबद्दल दया दाखवू नये, हेही त्या सांगायला विसरल्या नाहीत. इतकेच नव्हे तर हरिद्वारच्या पूरभैयांची खास बटाट्याची रस्सा भाजीची विस्तृत पाककृतीही मला सांगायला त्या विसरल्या नाहीत. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आशाताईंचा गौरव करताना, ‘आशा भोसले या चौखन्नी गायिका आहेत,’ हे बोलल्याचे मला याक्षणी आठवले. कारण, गायनाच्या सर्व पैलूत त्या गाऊ शकतात, याचा मला विश्वास बसला. जेव्हा रेकॉर्डिंगचा लाल दिवा लागतो तेव्हा भल्या भल्या गायिकांचा गोंधळ उडतो. पण, पंधराव्या वर्षापासून आशाताई रेकॉर्डिंगच्या त्या लाल दिव्याला डोळ्यात डोळे घालून गात आहेत, हेही पं. मंगेशकर यांनी एका लेखात नमूद केले होते, तेही मला आठवले. मुलाखतीसाठी आशाताईंच्या घरी जाण्याची संधी मिळाली.
त्यांचे घर खूप कलात्मक आणि सुंदर होते. मुलाखत झाल्यानंतरही त्यांनी माझ्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. मुलाखत संपल्यावर त्यांनी मला विचारले की, ‘तुम्ही आता कुठे जाणार?’ मी म्हणाले, पुण्याला. मग, त्या मला आधी गाण्याच्या रेकॉर्डिंगला घेऊन गेल्या आणि त्यानंतर त्यांनी मला सीएसटी स्टेशनला सोडले. आशाताईंबरोबर मुलाखतीनिमित्ताने घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या हृदयात कोरलेला आहे. हे क्षण मी कधीच विसरू शकत नाही. मुलाखतीनंतर 8 सप्टेंबरला त्यांचा 60 वा वाढदिवस होता. तेव्हाही त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो होतो. ‘आवाज चांदण्याचे’ कॅसेट त्यांनी भेट दिल्याची आठवते. मुलाखतीनंतर मी आशाताईंशी दूरध्वनीवर बोलण्याचे निमित्तही मिळाले. त्यानंतर त्यांना 2011 साली लतादीदींच्या घरी दुसऱ्यांदा भेटण्याची संधी मिळाली. आशाताईंशी एक वेगळेच नाते जुळले होते. आशाताईंचा आवाज म्हणजे जादू. त्यांच्या आवाजाच्या सुवर्णकाळात आम्ही जगलो, त्यांनी स्वरांची एक दुनिया निर्माण केली आणि रसिकांच्या मनावर गारूड निर्माण केले. एक लेखिका आणि एक चित्रपट संगीताची अभ्यासक म्हणून असे वाटते की, लहानपणी आम्ही लतादीदींच्या सुरेल आवाजाच्या प्रेमात पडलो, तर आशाताईंचा आवाज तसाच जादुई होता. ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान...’ यातून त्यांच्या गाण्याशी गट्टी जमली होती. त्यांच्या सुरेल आवाजाने आमच्याच पिढीला नाही, तर आत्ताच्या पिढीवरही जादू निर्माण केली आहे. आज त्या आपल्यात नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. (शब्दांकन: सुवर्णा चव्हाण)