पुणे

पुण्यात उन्हामुळे फळभाज्यांची आवक घटली; ‘या’ भाज्या झाल्या महाग ?

अमृता चौगुले

पुणे : उन्हाचा कडाक्याचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनावर झाल्याने रविवारी (दि. 11) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये फळभाज्यांच्या आवेकत मोठी घट झाली. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त राहिल्याने टोमॅटो, हिरवी मिरची, काकडी, दोडका, कारली, तोतापुरी कैरीच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली. तर, मागणीअभावी ढोबळी मिरचीच्या भावात घट झाल्याचे सांगण्यात आले.

बाजारात राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 80 ते 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत आवक दहा ट्रकने कमी राहिली. तर, बहुतांश फळांची आवक-जावक कायम राहिल्याने दर स्थिर राहिल्याची माहिती अडते विलास भुजबळ यांनी दिली.

परराज्यांतील कर्नाटक, गुजरात येथून सुमारे 7 ते 8 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून 4 ते 5 टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून घेवडा 3 टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून 5 ते 6 टेम्पो मटार, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी 4 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 10 टेम्पोंची आवक झाली.

पुणे विभागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 800 ते 900 गोणी, गवार 5 ते 6 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो सुमारे 8 हजार क्रेट्स, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 7 ते 8 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, सिमला मिरची 8 ते 10 टेम्पो, भुईमूग शेंगा सुमारे 200 गोणी, गावरान कैरी 2 टेम्पो, कांदा सुमारे 80 ट्रक, इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाट्याची 40 ट्रक आवक झाली होती.

चाकवत, पुदिना, अंबाडी, चुका, पालक स्वस्त

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीची 1 लाख 25 हजार जुडींची आवक झाली, तर मेथीची 50 हजार जुडी इतकी आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरीची आवक 25 हजार जुडींनी घटली. तर, बहुतांश पालेभाज्यांची आवक स्थिर राहिली. मागणी कमी झाल्याने घाऊक बाजारात चाकवत, पुदिना, अंबाडी, चुका, पालकच्या भावात शेकडा जुडीच्या भावात 100 ते 200 रुपयांनी घट झाली होती. आवक घटल्याने मेथी, शेपू, पालकच्या शेकडा जुडीच्या भावात 200 रुपयांनी वाढ झाली होती. इतर सर्वच पालेभाज्यांचे भाव स्थिर होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT