पुणे

पुणे : सशस्त्र दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; 18 गुन्ह्यांचा छडा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली आहे. पुणे आणि नगर जिल्ह्यातील 18 दरोडे, घरफोडी गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून चोरी केलेले तीनशे ग्राम सोन्याचे दागिने असा 17 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. या वेळी अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे आदी उपस्थित होते. चोरीचे दागिने घेणार्‍या सराफालादेखील पोलिसांनी अटक केली आहे.

गणेश सुरेश भोसले (वय 28, रा. वाळुंज, ता. आष्टी, जि. बीड, सध्या रा. निघोज, ता. पारनेर, अहमदनगर), किरण भाऊसाहेब बेंद्रे (रा. वाळुंज, अहमदनगर), अजय उल्हास काळे (रा. कडूस, ता. पारनेर, जि. अहमदनगर) या आरोपींना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्याचा तपास करीत असताना, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तपास करीत त्यांनी सुरुवातीला अजय काळे या आरोपीला पकडले. त्याच्याकडे केलेल्या तपासात आरोपी गणेश भोसले यांचे नाव निष्पन्न झाले.

त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तपासात त्यांनी वेळोवेळी दरोडे, जबरी चोरी व घोरफोडी चोरी करून चोरलेले सोन्याचे दागिने हे सोनार किरण बेंद्रे या सराफास विक्री केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींना कोर्टात हजर केले असता, 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कामगिरी पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, महादेव शेलार, पोलीस शिपाई गणेश जगदाळे, अभिजित सावंत, अमित पाटील, प्रदीप चौधरी, शिवाजी ननावरे, शब्बीर पठाण, हनुमंत पाटील, एस. वाघमारे यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे हे करीत आहेत. ही टोळी गावाबाहेरील घरे, सीसीटीव्ही नसलेला परिसर, तसेच कॅनॉलशेजारी राहणारी घरे यांना लक्ष करून त्याठिकाणी दरोडा व घरफोडीचे गुन्हे करीत होती.

आरोपी गणेश भोसले हा दरोडा टाकताना नागरिकांवर शस्त्राने वार करीत होता. आळेफाटा येथे भोसले या आरोपीने एका व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याला गंभीर जखमी केल्याने 50 टाके पडले होते. तर, नारायणगाव याठिकाणी एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करीत त्याचे चार ते पाच दात तोडले. त्याचप्रमाणे आळेफाटा आणि शिरूर येथे महिलांच्या कानातील दागिने चोरताना कान तोडल्याची घटना घडली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT