पुणे

Pune : भीमाशंकर मंदिरातील पुजार्‍यांची पगारी तत्त्वावर नेमणूक करा

अमृता चौगुले

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात असलेल्या पुजार्‍यांची दडपशाही व भाविकांबरोबरची गैरवर्तणूक दिवसेंदिवस वाढत असून, याचा त्रास येणार्‍या भाविक-भक्तांना होत आहे. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने पगारी तत्त्वावर पुजार्‍यांची नेमणूक करावी, तसेच पुजार्‍यांच्या मालमत्तेची चौकशी करून भाविक-भक्तांना न्याय द्यावा, अशी मागणी मंचर (ता. आंबेगाव) येथील अमरनाथ सेवा संघाचे संस्थापक सूर्यकांत धायबर यांनी केली आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मंदिराच्या गाभार्‍यात पाटावर पूजेसाठी बसल्याच्या कारणावरून पुजार्‍यांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. याप्रकरणी दोन्ही गटातील 36 जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, या घटनेचा भीमाशंकर येथे येणारे देशभरातील भाविक-भक्त संताप व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या :

भीमाशंकर परिसरात येणार्‍या भाविक-भक्तांना काही पुजारी अरेरावी करतात, उद्धटपणे बोलतात, दमबाजी करतात. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे 12ही महिने देशभरातून भाविक-भक्त दर्शनासाठी येत असतात. मात्र, देवस्थानचे पुजारीच मारामारी करत असतील, तर राज्य शासनाने या ठिकाणी पगारी पुजारी नेमावे, तसेच पुजार्‍याच्या संपत्तीची चौकशी करावी. देवस्थानला किती पैसे जातात, पुजारी किती घेतात यासाठी एक समिती नेमावी. या सर्वांची चौकशी निवृत्ती न्यायाधीशांच्या समितीद्वारे करण्यात यावी, अशी मागणी सूर्यकांत धायबर यांनी केली आहे. याबाबत धर्मादाय आयुक्त व मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही धायबर यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT