पुणे: राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएने राष्ट्रीय शिक्षक प्रवेश परीक्षेसाठी (एनटीईटी 2025) अधिसूचना जाहीर करून अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या परीक्षेला बसू इच्छिणार्या उमेदवारांना एनटीएच्या अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. त्यासाठी 23 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 24 जूनपर्यंत परीक्षा शुल्क जमा करण्याची संधी उमेदवारांना देण्यात आली आहे.
भविष्यात अध्यापन क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करणारे आणि आयुर्वेद, सिद्धा, युनानी, होमिओपॅथीमध्ये पदव्युत्तर पदवी (बी.यू.एम.एस, बी.एस.एम.एस, एम.डी) केलेले उमेदवार या परीक्षेत सहभागी होण्यास पात्र आहेत. (Latest Pune News)
एनटीईटी 2025 परीक्षेत सहभागी होण्यासाठी, सामान्य (अनारक्षित) / एनआरआय / ओसीआय / परदेशी नागरिक श्रेणीतील उमेदवारांना 4 हजार रुपये, सामान्य ईडब्ल्यूएस श्रेणी आणि ओबीसी(एनसीएल) श्रेणीतील उमेदवारांना 3 हजार 500 रुपये आणि एससी, एसटी, दिव्यांग आणि तृतीयपंथी उमेदवारांना 3 हजार रुपये भरावे लागतील.
अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा करता येईल. राष्ट्रीय शिक्षक प्रवेश परीक्षा 2025 ही राष्ट्रीय परीक्षा एजन्सी एनटीएद्वारे 27 जुलैला देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षेदरम्यान उमेदवारांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 120 मिनिटे दिले जातील. परीक्षेशी संबंधित तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.
असा भरता येईल अर्ज...
एनटीए-एनटीईटी ऑनलाइन फॉर्म 2025 भरण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या. वेबसाइटच्या होम पेजवर ’नोंदणी/ लॉगिन करा’ येथे क्लिक करा. आता तुम्हाला पहिल्या नोंदणी लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर, उमेदवारांनी इतर तपशील भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. शेवटी, उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट घेणे गरजेचे आहे.