पुणे: अकरावी प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर ते राहत असलेल्या परिसरातच विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी होती. परंतु, आता संपूर्ण राज्याकरिता विद्यार्थ्यांना एकच प्रवेश अर्ज करावा लागेल. या प्रवेश अर्जानुसार संबंधित विद्यार्थ्याला राज्यातील कोणत्याही ठिकाणच्या उच्च माध्यमिकची शाखा निवडण्याचा पर्याय उपलब्ध असेल. त्यामुळे विद्यार्थी कोठेही राहत असला, तरी त्याला संपूर्ण राज्यातील महाविद्यालये प्रवेशासाठी उपलब्ध राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Pune News)
येत्या शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन पद्धतीनेच राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 6 मे रोजी सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध करत अकरावी प्रवेशासाठी स्पष्ट आणि सुसंगत नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये संपूर्ण प्रक्रिया गुणवत्ताधिष्ठित, पारदर्शक आणि एकसंध असावी, यासाठी आवश्यक त्या सूचनांचा समावेश करण्यात आला असून प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे.
संपूर्ण राज्यभरातील महाविद्यालये शासनाने निर्धारित केलेल्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरच प्रवेश प्रक्रिया पार पाडणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांनुसार महाविद्यालय निवडण्याची मुभा देण्यात आली असून, चार फेर्यांद्वारे प्रवेश दिला जाणार आहे.
या चार फेर्यांनंतर ’सर्वांसाठी खुला प्रवेश’ (ओपन फॉर ऑल) नावाची विशेष फेरी जाहीर करण्यात येणार असून, उर्वरित रिक्त जागांवर त्या माध्यमातून प्रवेश मिळणार आहे. प्रवेश अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांना त्यांचे वैयक्तिक माहितीपत्रक, गुणपत्रक व प्राधान्यक्रमानुसार निवडलेली महाविद्यालयांची यादी ऑनलाइन प्रणालीत भरावी लागेल. संबंधित शाळांनीही ही माहिती पडताळून प्रमाणित करणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, व्यवस्थापन, अल्पसंख्याक व इनहाऊस कोट्यांतर्गत प्रवेशासाठी स्वतंत्र ’शून्य फेरी’ आयोजित करण्यात येणार आहे. मात्र या प्रवेशांची नोंदसुद्धा संबंधित संस्थांनी ऑनलाइन प्रणालीवर अनिवार्यपणे करावी लागणार आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महाविद्यालयांनी अंतिम यादीही ऑनलाइन प्रसिद्ध करावी लागणार आहे. ऑफलाइन पद्धतीने करण्यात आलेली कोणतीही प्रवेश प्रक्रिया वैध मानली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा शासनाने दिला आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता, पारदर्शकता आणि गैरप्रकाराला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिक्षण विभागाकडून प्रत्येक टप्प्यावर प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जावी यासाठी विशेष समन्वयक नेमण्यात आले आहेत आणि संबंधित यंत्रणांवर देखरेख ठेवली जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीतून संपूर्ण प्रक्रिया राबवल्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांना अधिक सोयीची, विश्वासार्ह आणि स्पष्ट अशी प्रणाली उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
...असे आहे वेळापत्रक
शाळा, महाविद्यालयांची माहिती संकेतस्थळावर नोंद करणे: 8 ते 15 मे
उच्च माध्यमिकच्या शाखांची माहिती प्रमाणित करणे: 8 ते 15 मे
विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रोफाइल तयार करणे: 19 ते 28 मे
विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरणे: 19 ते 28 मे
शून्य फेरी, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक व इनहाऊस कोट्यातील प्रवेश निश्चित करणे:प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी
प्रथम फेरी घोषित करणे व प्रवेश घेणे: प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी
द्वितीय फेरी घोषित करणे व प्रवेश घेणे: प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी
तृतीय फेरी घोषित करणे व प्रवेश घेणे: प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी
चतुर्थ फेरी घोषित करणे व प्रवेश घेणे: प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी
सर्वांसाठी खुले व प्रत्यक्ष प्रवेश घेणे: प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी
उच्च माध्यमिक अकरावीचे वर्ग सुरू करणे: 11 ऑगस्ट किंवा शासन निर्धारित करेल त्या दिवशी